खादी कापडांवरील ‘जीएसटी’ आजपासून रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:35 IST2017-10-02T00:35:17+5:302017-10-02T00:35:17+5:30
केंद्र सरकारने गांधी जयंतीचे औचित्य साधून खादी कापडावरील जीएसटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

खादी कापडांवरील ‘जीएसटी’ आजपासून रद्द
राम शिनगारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि खादी हे अतूट नाते आहे. यामुळे पहिल्यापासून खादीला करांमधून विशेष सूट देण्यात येते. १ जुलैपासून देशभर लागू झालेला ‘वस्तू आणि सेवाकर’ (जीएसटी) खादीवर ५ ते १२ टक्के आकारण्यात येत होता. या कराचा फटका खादी उद्योगाला बसला. शेवटी केंद्र सरकारने गांधी जयंतीचे औचित्य साधून खादी कापडावरील जीएसटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वातंत्र्याच्या संघर्षात खादी कापड सर्वांच्या प्रेरणेचे, अस्मितेचे प्रतीक बनले होते. महात्मा गांधी यांनी खादीला प्रोत्साहन दिले. ते स्वत: दररोज चरख्यावर कापड विणत, त्यामुळे कार्यकर्त्यांनाही खादीचे विशेष आकर्षण होते. स्वातंत्र्यानंतरही खादी घालणे हे गांधी विचारांचे प्रतीक मानले जाई. पुढे खादी घालणारे म्हणजे पुढारी अशीही प्रतिमा तयार झाली. या खादीची लोकप्रियता वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रयत्न केले; मात्र खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या यावर्षीच्या दिनदर्शिकेवरील गांधीजींचे छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र लावले. यावरून देशभर आरोप-प्रात्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. याच खादी कपड्यांवर १ जुलैपासून देशभर लागू झालेला जीएसटी कर आकारण्याचा निर्णय झाला.
या निर्णयामुळे अगोदरच अडचणीत असलेला खादी उद्योग जास्तच अडचणीत सापडला. याचा परिणाम जीएसटी लागू झाल्यापासून खादी कपड्यांच्या विक्रीत तब्बल २० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. याची दखल घेत खादी मंडळाने जीएसटी परिषदेसमोर खादी कापडांच्या विक्रीमध्ये झालेल्या घटीचे सादरीकरण केले. हा कर कायम ठेवला तर खादी उद्योग बंद पडू शकतो, असेही स्पष्ट केले. एकीकडे पंतप्रधान मोदी खादीच्या प्रसारासाठी प्रयत्न करतात. युवकांना खादी वापरण्याचे आवाहन करतात, तर दुसरीकडे खादीच्या कपड्यांवर कर आकारण्यात येतो. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात खादीवर कर आकारण्यात येत नव्हता, असेही जीएसटी परिषदेच्या लक्षात आणून दिल्याचे मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे अध्यक्ष ना. वि. देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यानंतर जीएसटी परिषदेने खादीच्या कापडावरील कर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी गांधी जयंतीपासून (२ आॅक्टोबर) करण्यात येणार असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.