जीएसटी कर्मचा-यांचे शुक्रवारी, शनिवारी सामूहिक रजा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:28 IST2018-01-03T00:28:15+5:302018-01-03T00:28:20+5:30
प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी जीएसटी विभागातील कर्मचारी ५ व ६ रोजी सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत.

जीएसटी कर्मचा-यांचे शुक्रवारी, शनिवारी सामूहिक रजा आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी जीएसटी विभागातील कर्मचारी ५ व ६ रोजी सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत.
यासंदर्भात महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिकारी-कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, या विभागातील अधिकाºयांवर वेतनश्रेणीबाबात शासनस्तरावर सातत्याने अन्याय होत आहे. संघटनेला विश्वासात न घेता सेवाशर्ती, पुनर्रचनाचे परस्पर निर्णय घेतले जात आहेत. वस्तू व सेवाकराच्या वसुलीसाठी खासगीकरण व कंत्राटीकरणाच्या माध्यमातून कामे करण्याचा घाट घातला जात आहे. विविध संवर्गातील रिक्तपदावर भरती होत नाही. केंद्राच्या धर्तीवर वस्तू व सेवाकर काम आता केले जाणार असल्यामुळे समानकाम, समानपद, समान वेतनही त्रिसूत्री आवश्यक आहे, असे नमूद करण्यात आले आहे. सरकारचे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दोन दिवस कर्मचारी सामूहिक रजेवर जाणार आहेत. या निवेदनात समन्वय समितीचे एस.एम. जोनवाल, विभागीय सहसचिव प्रकाश क्षीरसागर, सदस्य ज्योती गायसमुद्रे, सदस्य राजू मगर आदींची नावे आहेत.