अनुदान वाढीमुळे बांधकामास येणार गती
By Admin | Updated: November 19, 2014 00:58 IST2014-11-19T00:51:21+5:302014-11-19T00:58:18+5:30
संजय कुलकर्णी , जालना केंद्र सरकारने ग्रामीण भागात शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम १२ हजारांपर्यंत वाढविल्याने शौचालयांच्या बांधकामांना आता गती येणार आहे.

अनुदान वाढीमुळे बांधकामास येणार गती
संजय कुलकर्णी , जालना
केंद्र सरकारने ग्रामीण भागात शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम १२ हजारांपर्यंत वाढविल्याने शौचालयांच्या बांधकामांना आता गती येणार आहे. जिल्ह्यात जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने बुधवारी सहा हजार शौचालयांच्या बांधकामाचा प्रारंभ होत आहे.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छतेची चळवळ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २०१४-१५ या वर्षासाठी ३६ हजार ३९९ शौचालयांच्या बांधकामाचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले आहे. जागतिक शौचालय दिन १९ नोव्हेंबर रोजी आहे. यानिमित्ताने १४ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत गावोगाव ग्रामसभा, शाळा, अंगणवाड्यांतर्फे प्रभातफेऱ्यांद्वारे वातावरण निर्मिती करण्यात येत आहे.
पूर्वी शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना ४ हजार ६०० रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. परंतु या पैशात शौचालय बांधकामाचे काम पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होत होत्या. कारण ई-मस्टर वेळेवर तयार होत नसल्याने मग्रारोहयोअंतर्गत या कामांना खीळ बसली होती. परंतु आता अनुदान वाढल्याने शौचालय बांधकामांना गती येणार असा विश्वास जनतेतूनच व्यक्त करण्यात येत आहे.
१२ हजार रुपयांच्या अनुदानामध्ये ९ हजार केंद्र सरकारचे तर ३ हजार रुपये राज्य शासनाचे असणार आहेत. अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा या तालुक्यांमध्ये एक हजार शौचालयांच्या बांधकामास प्रारंभ होत आहे. उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील ग्रामसेवकांची बैठक सीईओ प्रेरणा देशभ्रतार यांच्या आदेशान्वये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे व स्वच्छ भारत अभियानचे समन्वयक सूर्यकांत ताटे यांनी नुकतीच घेतली. कलापथक आणि फिल्म शो द्वारेही जनजागरण करण्यात आल्याचे अभियानाचे भगवान तायड आणि संजय डोंगरदिवे यांनी सांगितले.