कृषीपंप जोडणीला मिळणार गती
By Admin | Updated: March 23, 2016 01:08 IST2016-03-23T00:25:05+5:302016-03-23T01:08:52+5:30
राजेश खराडे , बीड जिल्ह्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील कृषीपंप जोडणीचा अनुशेष भरून काढण्यासाठी महावितरणच्या विशेष मोहिमेतील कृषीपंपाच्या जोडणीची कामे रखडली आहेत.

कृषीपंप जोडणीला मिळणार गती
राजेश खराडे , बीड
जिल्ह्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील कृषीपंप जोडणीचा अनुशेष भरून काढण्यासाठी महावितरणच्या विशेष मोहिमेतील कृषीपंपाच्या जोडणीची कामे रखडली आहेत. त्याअनुषंगाने मंगळवारी राज्याचे कार्यकारी संचालक सी.एच. येरमे यांनी आढावा बैठक घेऊन कंत्राटदारांबरोबर अधिकाऱ्यांचीही झाडाझडती घेतली. ‘लोकमत’ने हे प्रकरण लावून धरले होते.
कृषीपंपधारकांना वीज प्रवाहात आणण्याकरिता साठ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी बीड विभागाला मिळाली होती. यामधून ८ हजार पाचशे कृषीपंपाची जोडणी करण्याचे विभागाला उद्दीष्ट पैकी अद्यापपर्यंत केवळ ४ हजार कृषीपंप जोडण्यात आले आहेत. मार्च अखेरपर्यंतच योजनेचा कालावधी असून उर्वरीत १५ दिवसांत कामे कशी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. यासंबंधी लोकमत ने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत खुद्द राज्याचे कार्यकारी संचालकांनी या कामांचा आढावा विभागीय कार्यालयात घेतला. यावेळी मुख्य अभियंता अनिल भोसले, अधीक्षक अभियंता रतन सोनुले उपस्थित होते. योजना पूर्णत्वाला कालावधी लागला तरी चालेल मात्र शेतकऱ्यांच्या हेतूने कृषीपंप जोडणीची योजना सुरूच राहणार असल्याचे येरमे यांनी येथील आढावा बैठकीत सांगितले. तर अद्यापपर्यंत कामेच सुरू केलेली नाहीत अशा कंत्राटदारांना त्यांनी तंबी दिलेली आहे. कृषीपंप जोडणीची कामे दर्जात्मक होण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या.
वायरमनचेही ऐकले गाऱ्हाणे
स्थानिक पातळीवर काम करीत असताना संरक्षणात्मक साहित्याची पुर्तता केली जात नाही. उपविभागीय कार्यालयात सोई-सुविधा नसल्याने तारांबळ होत आहे. शिवाय आर्थिंगकरिताही पाणी उपलब्ध नसल्याच्या तक्रारी वायरमन यांनी कार्यकारी संचालक येरमे यांच्या कडे केल्या. साहित्य पुरविण्याविषयी अधीक्षक अभियंता रतन सोनुले यांना सूचना केल्या.