गट-तट म्हणजे वैयक्तिक फायद्यासाठीच्या टोळ्या

By Admin | Updated: April 10, 2015 00:27 IST2015-04-10T00:23:09+5:302015-04-10T00:27:26+5:30

कळंब : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असा एकीकडे गौरव करायचा, आणि दुसरीकडे आमचे बाबासाहेब म्हणून त्यांना जातीपुरतेच ठेवायचे

Group-side is the group of individual beneficiaries | गट-तट म्हणजे वैयक्तिक फायद्यासाठीच्या टोळ्या

गट-तट म्हणजे वैयक्तिक फायद्यासाठीच्या टोळ्या


कळंब : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असा एकीकडे गौरव करायचा, आणि दुसरीकडे आमचे बाबासाहेब म्हणून त्यांना जातीपुरतेच ठेवायचे. ही आंबेडकरी विचारांची शुध्द फसवणूक असल्याचे सांगत आज विविध गट-तट पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या या चळवळी नव्हेत तर स्वत:च्या फायद्यासाठी सत्तेच्या शोधात निघालेल्या या टोळ्या असल्याची घणाघाती टीका ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केली.
कळंब येथील राजर्षी शाहू साहित्य नगरीत आयोजित राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव, प्रा. प्रल्हाद लुलेकर, प्राचार्य डॉ. अशोक मोहेकर, स्वागताध्यक्ष संजय कांबळे, सभापती हरिष डावरे यांची विचारमंचावर उपस्थिती होती.
आंबेडकरवाद्यांना मित्र हवेत की नको, असा प्रश्न निर्माण होतो. केवळ जातीपुरतेच मर्यादीत राहिल्यास आपण कायम मायनॉरिटीमध्ये राहू. आणि मायनॉरिटीमध्ये असलेला समाज कधीही विजयाचा झेंडा फडकावू शकत नाही, असे सांगत जाती-धर्माच्या पलिकडे जावून समतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी समविचारी मित्रांची निवड करा. आपण स्वत:हून आपले दरवाजे बंद करून घेत आहोत. यामागे आंबेडकरी चळवळीतील काहींना आपली लिडरशीप धोक्यात येईल, अशी भिती वाटते. मात्र, हा मार्ग चुकीचा असल्याचे ते म्हणाले. जग बदलण्यासाठी वर्णन नव्हे वर्तन उपयोगी पडते. आपण जाती-पातीच्या भिंतीमध्ये अडकलो तर नष्ट होवून जाऊ. आपण धम्म हा केवळ स्वीकारला आहे. पण तो विकसित केला नाही. त्यासाठी स्वत:ची पात्रता, क्षमता विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे कांबळे म्हणाले. आंबेडकरी साहित्य सामाजिक न्यायाचा विचार करते. त्यामुळे समाजाशी जोडून घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. आंबेडकरी साहित्य शील सांगते, ते सर्वसमावेशक आहे. असेच साहित्य क्रांती करू शकते.
या साहित्याची जबाबदारी स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्याय यांचे ‘ब्रँडींग’ करणे आहे. जोपर्यंत आंबेडकरांच्या विचारांचा समग्र इतिहास साहित्यात प्रतिबिंबित होत नाही, तोपर्यंत ही साहित्य निर्मितीची प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कबीर यांच्या भाषेचा गंभीरपणे अभ्यास व्हायला हवा. साहित्य साचेबध्द होत असल्याने ते संपूर्णपणे समाजापर्यंत पोहोंचत नाही. त्यातच जागतिकीकरण हे साहित्य आणि त्याचे संदर्भ तोडण्याचे काम करीत आहे, ही गोष्टही अधोरेखित करायला हवी. भगवान गौतम बुध्दांनी सांगितलेली ‘भवंतु सुख मंगलम’ ही केवळ प्रार्थना नसून विचारांचा प्रवाह सतत वाहता राहिला पाहिजे, हा संदेशही असल्याचे कांबळे म्हणाले. संमेलनाचे उद्घाटक डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, आंबेडकरी साहित्य हे खूप मोठे आहे. त्यावर सविस्तरपणे व व्यापक चर्चा व्हायला हवी. साहित्याच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब व त्यांचे सर्व क्षेत्रातील कार्य समजून घेताना त्यामागची व्यापक भूमिकाही लक्षात घ्यायला हवी.
या संमेलनाच्या माध्यमातून त्या कार्याला सुरूवात होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक स्वातगाध्यक्ष प्रा. डॉ. संजय कांबळे, सूत्रसंचालन डॉ. दादाराव गुंडरे तर आभार के. व्ही. सरवदे यांनी मानले. दरम्यान, संमेलनापूर्वी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Group-side is the group of individual beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.