लेखापरीक्षणास गटविकास अधिकाऱ्यांनी घातला ‘खो’
By Admin | Updated: April 4, 2016 00:13 IST2016-04-04T00:10:56+5:302016-04-04T00:13:03+5:30
नांदेड : जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतींच्या लेखा परीक्षण विलंबप्रकरणी ग्रामसेवक व गटविकास अधिकारी कोणतेही गांभीर्याने बाळगण्यास तयार नसल्याची बाब पुढे आली आहे़

लेखापरीक्षणास गटविकास अधिकाऱ्यांनी घातला ‘खो’
नांदेड : जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतींच्या लेखा परीक्षण विलंबप्रकरणी ग्रामसेवक व गटविकास अधिकारी कोणतेही गांभीर्याने बाळगण्यास तयार नसल्याची बाब पुढे आली आहे़ त्यामुळे संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असून अशा ग्र्रामपंचायती १४ व्या वित्त आयोगाच्या पुढील वर्षाच्या निधीपासून वंचित राहणार आहेत़
जि़ प़ चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यु़ ए़ कोमवाड यांनी मागील महिन्यातच संबंधित ग्रामसेवक, गटविकास अधिकाऱ्यांना नोटिसा बजावून अभिलेखे सादर करण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत दिली होती़ मात्र या नोटीसला केराची टोपली दाखवत गटविकास अधिकाऱ्यांनी हा विषय दुर्लक्षित केला़ त्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमवाड यांनी संबंधित गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांवर कारवाईचे शस्त्र उगारले आहे़
लेखापरीक्षणाचे अभिलेखे सादर न करण्यामागचे कारण काय, अशी विचारणा करून लेखापरीक्षण न झाल्यास पुढील वर्षाचा १४ व्या वित्त आयोगातील निधी मिळणार नसल्याचे कळविले आहे़ लेखापरीक्षण न करणाऱ्या ३८१ ग्रामपंचायती आहेत यात मुखेड तालुक्यात ६५, किनवट ५७, हदगाव ५०, अर्धापूर ४, मुदखेड १७, कंधार २६, देगलूर २८, बिलोली २३, नायगाव २४, धर्माबाद ९, भोकर १८, हिमायतनगर ११, माहूर १८, उमरी १० व लोहा तालुक्यातील १७ ग्रामपंचायती आहेत़ या ग्रामपंचायतींना मागील सहा महिन्यापासून सातत्याने पाठपुरवा करून ही गटविकास अधिकारी याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यास तयार नाहीत़