एअर अॅम्ब्युलन्ससाठी ग्रीन सिग्नल
By Admin | Updated: June 26, 2016 00:40 IST2016-06-26T00:14:48+5:302016-06-26T00:40:08+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर अॅम्ब्युलन्सची सेवा सुरू करण्यासाठी अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

एअर अॅम्ब्युलन्ससाठी ग्रीन सिग्नल
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर अॅम्ब्युलन्सची सेवा सुरू करण्यासाठी अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे. ही सेवा सुरू करणाऱ्या कंपनीला एअर अॅम्ब्युलन्सच्या पार्किं गसाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच विमानतळावरून एअर अॅम्ब्युलन्सचे उड्डाण होणार आहे. अवयव प्रत्यारोपणासारख्या महत्त्वाच्या क्षणी थेट औरंगाबादेतून २४ तास एअर अॅम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध होईल.
जानेवारीमध्ये मराठवाड्यातील पहिल्याच अवयवदानात केवळ हवाई सेवेअभावी हृदय चेन्नईला पोहोचू न शकल्याची घटना घडली. त्यामुळे या घटनेनंतर एअर अॅम्ब्युलन्सची सेवा किती महत्त्वाची आहे, हे समोर आले. एअर अॅम्ब्युलन्सअभावी गंभीर आजारी, जखमी रुग्ण आणि अवयव प्रत्यारोपणासाठी संबंधित अवयव अन्य शहरांमध्ये नेईपर्यंत वेळ उलटून जातो. त्यामुळे ही सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रियांना वेग देण्यात आला होता.
एअर अॅम्ब्युलन्सची सेवा सुरू करण्यासाठी मुंबई येथील मॅब एव्हिएशन कंपनीकडून प्रतिसाद देण्यात आला. या कंपनीच्या एकापथकाने जानेवारीत विमानतळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव मंजुरीसाठी विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात आला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रस्तावाच्या मंजुरीची प्रतीक्षा केली जात होती. अखेर वरिष्ठ कार्यालयाकडून एअर अॅम्ब्युलन्सच्या पार्किंगसाठी परवानगी देण्यात आली. त्यासंदर्भात कंपनीला पत्रही प्राप्त झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही सेवा सुरू करण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.