जिल्ह्यात नोटांचा प्रचंड तुटवडा
By Admin | Updated: November 13, 2016 00:33 IST2016-11-13T00:34:14+5:302016-11-13T00:33:23+5:30
जालना : पाचशे व हजार रूपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी शनिवारी शहरातील विविध बँकांपाशी मोठ्या रांगा दिसून आल्या.

जिल्ह्यात नोटांचा प्रचंड तुटवडा
जालना : पाचशे व हजार रूपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी शनिवारी शहरातील विविध बँकांपाशी मोठ्या रांगा दिसून आल्या. दिवसभरात विविध बँका मिळून तीन दिवसांत १०० कोटी रूपयांची रक्कम जमा झाली असावी असा अंदाज बँक अधिकारी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, सर्वच बँकांमध्ये नोटांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.
नोटांचे चलन बाजारपेठेत नसल्याने व्यवहारावरही परिणाम होत आहे. यामुळे परिस्थिती विचित्र बनली आहे. बँकांकडून ठोस माहिती अथवा सर्वच बँकांचे एखादे माहिती सुविधा केंद्र स्थापन करण्याची मागणी जोर धरत आहे. तीन दिवसांपूर्वी पाचशे व हजार रूपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्या आहेत. या नोटा बदलून नवीन नोटा मिळविण्यासाठी सर्वच बँकांमध्ये गर्दी वाढल्याने बँक सेवाही ठप्प होत आहे. शहरातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये सायंकाळी उशिरापर्यंत रांगा दिसून येत होत्या. बँकांमध्ये शंभर, पाचशे व दोन हजार रूपयांच्या नोटा नाहीत. आहे त्या नोटाही पुरेशा आलेल्या नाहीत.
शनिवारी पाचशे रूपयांऐवजी २ हजार रूपयांच्या नोटा उपलब्ध झाल्या. प्रत्येक बँकेतून ४ हजार रूपयांप्रमाणे नोटांचे वितरण करण्यात आले. एकूणच दुसऱ्या दिवशीही बँकांबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी कायम होती. बँक आॅफ इंडियाचे मुख्य प्रबंधक लक्ष्मण निनावे म्हणाले, दोन ते तीन दिवसांत साडेतीन कोटी रूपयांचा पाचशे व हजार रूपयांच्या नोटा ग्राहकांनी जमा केल्या. मागणी केलेल्या ग्राहकांना दोन हजार व शंभर रूपयांच्या नोटांचे वितरण करण्यात आले. दोन हजारच्या नवीन नोटांचे ५५ लाख रूपये वितरण करण्यात आले. नवीन नोटांचे वितरण करण्यावर निर्बंध असल्याने कमीत कमी चार तर जास्तीत जास्त दहा हजार रूपयांचे वितरण करण्यात येत असल्याचे निनावे म्हणाले.
महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक पी.एम.होळकर म्हणाले, शहरातील दोन्ही शाखा मिळून हजार व पाचशे रूपयांच्या जुन्या नोटा मिळून ५ कोटी रूपयांचा भरणा केला. दोन हजार रूपयांच्या नोटांचेही ग्राहकांना वितरण करण्यात आले. ही रक्कम पाच लाख रूपये असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)