भूवैज्ञानिकांच्या अभिप्रायाची अडसर
By Admin | Updated: December 10, 2014 00:40 IST2014-12-10T00:34:41+5:302014-12-10T00:40:41+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यातील ९४३ गावांना टंचाईग्रस्त म्हणून मान्यता देण्यात आली असून, नळयोजना विशेष दुरुस्ती व पूरक नळयोजनेचे शेकडो प्रस्ताव ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा विभागात

भूवैज्ञानिकांच्या अभिप्रायाची अडसर
लातूर : लातूर जिल्ह्यातील ९४३ गावांना टंचाईग्रस्त म्हणून मान्यता देण्यात आली असून, नळयोजना विशेष दुरुस्ती व पूरक नळयोजनेचे शेकडो प्रस्ताव ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा विभागात सादर होत आहेत. मात्र भूवैज्ञानिकांचा अभिप्राय आल्याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता मिळत नाही. विशेष दुरुस्तीसाठी १५ लाख व उद्भव बळकटीकरणासाठी १० लाखांपर्यंतच्या कामांना मंजुरी देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असला, तरी भूवैज्ञानिकांचा अभिप्राय नसल्याने अडसर ठरत आहे.
उदगीर तालुक्यातील हंगरगा नळयोजनेच्या विशेष दुरुस्तीचा प्रस्ताव पावसाळ्यातच दाखल झाला होता. मात्र या प्रस्तावाला २८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली. आॅक्टोबर महिन्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नळयोजना विशेष दुरुस्ती घेण्याबाबत तांत्रिक मान्यतेसह प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावासोबत भूवैज्ञानिकांचे शिफारसपत्र नव्हते. त्यामुळे मंजुरीला अडसर आला होता. दरम्यान, भूवैज्ञानिकांचे प्रपत्र घेतल्यानंतर परत हा प्रस्ताव सादर करण्यात आला. हंगरगा गावाची लोकसंख्या १७०२ असून, भूवैज्ञानिकांच्या प्रपत्रानुसार गावातील पाण्याची पातळी ३२ ते ३० मीटरवर आहे. गावात पाच विंधन विहिरी आहेत. विशेष दुरुस्ती केल्यास पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशी शिफारस भूवैज्ञानिकांनी केल्यानंतर ४ लाख ९० हजार रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. टंचाई कालावधीत घ्यावयाच्या नऊ उपाययोजनांपैकी स्थानिक परिस्थितीचा विचार करता किमान खर्चाची योजना असावी व सदर योजना मागील तीन वर्षांत घेतलेली नसावी, अशा सूचना शासनाच्या असल्याने भूवैज्ञानिकांच्या शिफारशीनुसार या योजनेला मान्यता दिली आहे. सदर योजना ही कायमस्वरूपी होणार असल्यामुळे मंजूर करण्यात आली आहे. परंतु, प्रस्तावासोबत भूवैज्ञानिकांच्या पाणीपातळीबाबतचा अहवाल असणे आवश्यक आहे.
देवणी तालुक्यातील विळेगाव नळयोजना विशेष दुरुस्तीला याच पद्धतीने मान्यता देण्यात आली आहे. अंदाजित ३ लाख २३ हजार ३०० रुपयांच्या खर्चाला या योजनेसाठी मान्यता देण्यात आली आहे. सदर गावात पाच विंधन विहिरी असून, या गावातही पाणीपातळी ३० ते ३२ मीटरपर्यंत आहे. नळयोजनेची विशेष दुरुस्ती केल्यास पुरेसा पाणीपुरवठा होईल, असा अभिप्राय भूवैज्ञानिकांचा आल्यानंतर या योजनेला मान्यता मिळाली आहे. उदगीर तालुक्यातील हंगरगा योजनेसाठी ४ लाख ९० हजार व देवणी तालुक्यातील योजनेला ३ लाख २३ हजार ३०० रुपये अशा एकूण ८ लाख १३ हजार ३०० रुपयांच्या खर्चास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. ४
पाणीटंचाईअंतर्गत नळयोजना विशेष दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर एक महिन्याच्या आत योजना कार्यान्वित करण्याच्या अटीवर मान्यता प्रदान करण्यात येत आहे. शासनादेश, निर्णय यांचे काटेकोर पालन करून या दोन्हीही योजना एक महिन्याच्या आत पूर्ण करून कार्यान्वित कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पण तात्काळ पाणीपुरवठ्यासाठी काही अटी शिथील कराव्यात, असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.