वृक्ष लागवड ठरले जनावरांसाठी कुरण
By Admin | Updated: July 15, 2016 00:54 IST2016-07-15T00:09:24+5:302016-07-15T00:54:48+5:30
विष्णू गायकवाड , गढी दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवडीचे ध्येय समोर ठेवून जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यातील शासकीय विभागाने झाडे लावण्याच्या सक्त सूचना दिल्या

वृक्ष लागवड ठरले जनावरांसाठी कुरण
विष्णू गायकवाड , गढी
दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवडीचे ध्येय समोर ठेवून जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यातील शासकीय विभागाने झाडे लावण्याच्या सक्त सूचना दिल्या. त्यानुसार १ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात तालुकाभरात रोपांची लागवड झाली. मात्र, लावण्यात आलेल्या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी कोणी घेतली नाही. त्यामुळे ही लहान रोपटे जनावरांचा चारा ठरत आहे. एका अर्थाने या योजनेचा बोजवारा उडाला आहे.
वनयुक्त शिवार योजना सुरू होण्यापूर्वी शासकीय पातळीवर मोठा गाजावाजा करण्यात आला. प्रत्येक शासकीय कार्यालयास जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीचे टार्गेट दिले गेले. १ ते ७ जुलै या कालावधीत वनयुक्त शिवार योजनेसाठीचा सप्ताह पार पडला. शासकीय कार्यालयांनी उद्दिष्टपूर्ती केली; परंतु मूळ मुद्दा होता तो लावण्यात आलेल्या वृक्ष संवर्धनाचा. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झाडे लावून सेल्फी काढत ती मुख्य कार्यालयाला पाठविली; परंतु आता अनेक ठिकाणी लावलेली रोपटी गायब झाली आहेत. काही ठिकाणी केवळ रोपट्याच्या काड्या उरल्या. झाडांची पाने शेळ्या-मेंढ्यांनी खाल्ली. त्यामुळे या उपक्रमाचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट होत आहे.
झाडे लावल्यानंतर त्याची जबाबदारी एखाद्या कार्यालयीन कर्मचाऱ्यावर देणे आवश्यक होते, असे वाटप असले तरी प्रत्यक्षात ते होणे अवघड आहे; कारण शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या मुळातच कमी असते. सर्वसामान्यांची कामे अनेक वेळा चकरा मारूनही होत नाहीत. त्यातच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना लावण्यात आलेल्या वृक्ष संवर्धनाची जबाबदारी देण्यात आली तर कार्यालयीन कामे ढेपाळतील. याशिवाय, झाडांना नियमित पाणी देणेही आवश्यक असते. पाणी दिले नाही तर रोप वाढणार कसे? हाही कळीचा मुद्दा ठरतो.
केवळ वृक्ष लागवड करून जबाबदारी पूर्ण करण्यासाठीचा हा देखावा आहे काय, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित केला जात आहे. लावण्यात आलेल्या झाडांना जनावरांपासून संरक्षण मिळावे यासाठी जाळ्या बसविणे उचित ठरते; परंतु हेही खर्चिक बाब असल्याने प्रत्यक्षात उतरणे अवघड आहे.