हरभरा पिकावर घाटेअळीचे आक्रमण !
By Admin | Updated: January 9, 2017 23:42 IST2017-01-09T23:39:25+5:302017-01-09T23:42:14+5:30
कळंब : तालुक्यात ६० हजार हेक्टर क्षेत्रावर रबी हंगामाचा पेरा झालेला असून या हंगामातील गहू, हरभरा व ज्वारी ही प्रमुख पिके वाढीच्या महत्वाच्या टप्यात आहेत.

हरभरा पिकावर घाटेअळीचे आक्रमण !
कळंब : तालुक्यात ६० हजार हेक्टर क्षेत्रावर रबी हंगामाचा पेरा झालेला असून या हंगामातील गहू, हरभरा व ज्वारी ही प्रमुख पिके वाढीच्या महत्वाच्या टप्यात आहेत. नादुरूस्त रोहित्राचे वाढलेले प्रमाण या पिकासमोरील मोठी समस्या ठरत आहे. पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याने गावोगावी या सुलतानी संकटामुळे असंख्य शेतकरी हैैराण झाल्याचे दिसून येते. हे थोडके म्हणून की काय, हरभऱ्याच्या पिकावर सध्या मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
रबीतील गहु, ज्वारी, हरभरा यांचा वाढीचा टप्पा सुरू झाल्यानंतर कळंब तालुक्यातील ६० हजार हेक्टरवरील रबी हंगामातील पिकांना संरक्षित पाण्याच्या पाळ्या देण्यासाठी गेल्या दिड महिन्यापासून शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. याशिवाय ऊस, टरबूज, मिरची आदी नगदी पिकांची लागवडही जोमात आहे. खरीपातील तूर व रबीतील हरभऱ्यावर अळींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना महागड्या किटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. तालुक्यात हरभऱ्याचे क्षेत्र साडेतीन पट वाढले असून तब्बल ३२७२२ हेक्टरवर पेरा झालेल्या हरभऱ्याला घाटेअळीपासून वाचविताना शेतकऱ्यांची दमछाक होवूलागली आहे. तर वाढत्या थंडीमुळे १६ हजार ७०० हेक्टरवरील ज्वारीच्या पिकांवर हिव पडण्याचा धोका निर्मान झाला आहे.
पांढऱ्या सोन्याकडून पुन्हा निराशा
तालुक्यातील कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात जवळपास साडेचार हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. परंतु, याही वर्षी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची या पांढऱ्या सोन्याने निराशा केली आहे. सोयाबीनच्या एकरी घटत्या उत्पादनाच्या धक्यातून शेतकरी सावरतो न सावरतो तोच अता कापसाचा एकरी उतारा निचांकी मिळाला. पावसाचा खंड, परत अतिवृष्टी यामुळे खुंटलेली वाढ, पातेगळ झाल्याने यंदाही कापसाची मजल एकरी दिड ते दोन क्विंटलपर्यंतच गेली. नफा तर सोडा कापसात अनेक शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागली. (वार्ताहर)