मरावाड्यातील तीन संस्थांना साहित्य व संस्कृती मंडळाकडून २ लाख रुपयांचे अनुदान
By Admin | Updated: June 23, 2017 22:49 IST2017-06-23T22:49:27+5:302017-06-23T22:49:27+5:30
अन्य मराठी साहित्य संमेलन अनुदान योजनेंतर्गत औरंगाबादच्या वरद गणेश वाचनालयासह राज्यातील १५ संस्थांची साहित्य व संस्कृती मंडळातर्फे निवड करण्यात आली आहे.

मरावाड्यातील तीन संस्थांना साहित्य व संस्कृती मंडळाकडून २ लाख रुपयांचे अनुदान
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 23 - अन्य मराठी साहित्य संमेलन अनुदान योजनेंतर्गत औरंगाबादच्या वरद गणेश वाचनालयासह राज्यातील १५ संस्थांची साहित्य व संस्कृती मंडळातर्फे निवड करण्यात आली आहे. या संस्थांना अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी प्रत्येकी २ लाख रुपये अनुदान मिळणार आहे. घाडगे पाटील प्रतिष्ठान (परभणी) आणि हिंगोली जिल्ह्यातील चुंचा येथील चतुराई प्रतिष्ठान या दोनसह मराठवाड्यातील तीन संस्था अनुदानास पात्र ठरल्या आहेत.
मुख्य प्रवाहापेक्षा काही तरी नवा विचार घेऊन मराठी साहित्य संमेलन आयोजित करणाºया संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, २०१० अंतर्गत अन्य मराठी साहित्य संमेलन अनुदान दिले जाते.
या योजनेसाठी मे महिन्यात अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार संपूर्ण राज्यातून ५३ संस्थांचे अर्ज मंडळाकडे प्राप्त झाले. या महिन्याच्या सुरुवातीला अंतिम निवडीसाठी झालेल्या बैठकीत १५ संस्थांची नावे निश्चित करण्यात आली, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी ‘लोकमत’ला दिली. या १५ संस्था २०१७-१८ या वित्तीय वर्षासाठी प्रत्येकी दोन लाख रुपये अनुदानासाठी पात्र ठरल्या.
वेगळ्या प्रवाहातील जनसमूहांच्या आणि उपेक्षित वर्गांच्या अन्य मराठी साहित्य संमेलने भरविण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून मंडळातर्फे ही योजना राबविण्यात येते. दरवर्षी मे महिन्यात योजनेसाठी अर्ज मागविण्यात येतात. साहित्य संमेलने, कार्यशाळा किंवा उपक्रम राबविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव आणि धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत संस्था अर्ज दाखल करू शकतात.
अनुदानास पात्र संस्थांची यादी-
१. श्री. वरद गणेश वाचनालय, औरंगाबाद
२. चतुराई प्रतिष्ठान, चुंचा (जि. हिंगोली)
३. घाडगे पाटील प्रतिष्ठान, परभणी
४. आंबेडकरी साहित्य व कला अकादमी, यवतमाळ
५. माऊली सामाजिक ज्ञानदान व अन्नदान संस्था, आवळी बु. (जि. कोल्हापूर)
६. करवीर नगर वाचन मंदिर, कोल्हापूर
७. समर्पण संस्था, जळगाव
८. आदर्श युवा मंडळ, करंजुल (जि. नाशिक)
९. राजाराम सीताराम दीक्षित वाचनालय, नागपूर
१०. आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर (जि. पुणे)
११. अंकुर साहित्य संघ, कौलखेड (जि. अकोला)
१२. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती, लमानतांडा (जि. नागपूर)
१३. सत्यशोधक विचार मंच, तरोडा (जि. नांदेड)
१४. अनुयोग शिक्षण संस्था, मुंबई
१५. भाषाविकास संशोधन संस्था, हलकर्णी (जि. कोल्हापूर)