शेततळे असणारे मंजूर लाभधारक वंचित
By Admin | Updated: July 20, 2014 00:35 IST2014-07-19T23:55:03+5:302014-07-20T00:35:50+5:30
मानवत : तालुका कृषी कार्यालयात मानव विकास योजनेतील तुषार संचाचा शेततळे असणारा मंजूर लाभधारक योजनेपासून वंचित आहेत.

शेततळे असणारे मंजूर लाभधारक वंचित
मानवत : तालुका कृषी कार्यालयात मानव विकास योजनेतील तुषार संचाचा शेततळे असणारा मंजूर लाभधारक योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे तुषार संचाच्या वाटपाच्या निकषांनाही अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखविण्यात आली आणि तुषार संचाचे मनमानी वाटप करण्यात आले. या वाटपात तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून कमालीची गुप्तताही पाळण्यात आली.
मानवत तालुका कृषी कार्यालयांतर्गत मानवत व रामेटाकळी हे दोन कृषी मंडळे आहेत. त्यातील मानवत कृषी मंडळाचे मंडळ अधिकारी मागील अनेक वर्षांपासून मानवत मंडळाचा कारभार पाहतात. मानवतसाठी अगोदर पाथरी तालुका होता. त्यावेळी मानवतमधील गावांचा कारभार विद्यमान मंडळ कृषी अधिकारी पाहत होते. पाथरी तालुक्याच्या विभाजनानंतर सेलू तालुका झाला. त्यावेळीही सेलू तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून मानवत परिसरातील गावे त्यांच्याकडेच होती. त्यानंतर मानवत तालुका निर्माण झाला आणि हे मंडळ अधिकारी तेव्हापासून येथेच कार्यरत आहेत.
शासनाच्या नियमानुसार कोणताही अधिकारी एका जागेवर किंवा कार्यालयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राहू नये. परंतु हे अधिकारी एकाच परिसरात जास्त काळ सेवा देत असल्याने येथील शेतकरी, विविध पक्षांचे कार्यकर्ते, नेते यांचा त्यांना चांगला अभ्यास झाला आहे.
शिवाय नेत्यांसोबत चांगले संबंध आणि नातलगांचा गोतवाळा यामुळे या अधिकाऱ्यांनी काहीही केले तरी धकून जाते. त्यामुळे हे अधिकारी निर्ढावून जाऊन मनमानी पद्धतीने कारभार करीत असतात. कार्यालयात नवीन आलेला तालुका कृषी अधिकारी त्यांचा दरारा पाहून त्यांची साथसंगत करतो आणि आपले काहीच वाकडे होणार नाही, या आर्विभावात वागतो.
‘लोकमत’चे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तालुक्यातील तुषार संचाच्या मंजूर लाभधारकांना आपल्या नावे तुषार संच मंजूर झाल्याचे कळाले. त्यापैकी एक जण तर तुषार संचासाठी असणाऱ्या निकषांना पात्र ठरणारा होता. परंतु त्याला तुषारसंच न मिळता त्याच्या नावावरील तुषारसंच दुसऱ्यास देण्यात आला. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून तालुका कृषी कार्यालयातील मनमानी कारभाराबाबत तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. (वार्ताहर)
अन्याय झाल्याची भावना