अतिरिक्त गावांमुळे ग्रामसेवकांवर ताण !
By Admin | Updated: July 1, 2014 01:03 IST2014-07-01T00:32:21+5:302014-07-01T01:03:12+5:30
विठ्ठल कटके , रेणापूर रेणापूर तालुक्यात ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांची चार पदे रिक्त असून, एकेका ग्रामसेवकाला तीन-तीन गावांचा पदभार दिल्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.

अतिरिक्त गावांमुळे ग्रामसेवकांवर ताण !
विठ्ठल कटके , रेणापूर
रेणापूर तालुक्यात ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांची चार पदे रिक्त असून, एकेका ग्रामसेवकाला तीन-तीन गावांचा पदभार दिल्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. तर काही ग्रामसेवक दहा-दहा वर्षांपासून नेमणुकीच्या ठिकाणीच कार्यरत आहेत.
रेणापूर तालुक्यात एकूण ६६ ग्रामपंचायती असून, ४२ सज्जे आहेत. रेणापूर, पोहरेगाव, कोष्टगाव, कारेपूर या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी तर उर्वरित ग्रामपंचायतींवर ग्रामसेवक ग्रामपंचायतींचे दैनंदिन काम पाहतात. एकूण ३६ ग्रामसेवक सहा ग्रामविकास अधिकाऱ्यांमध्ये २२ पुरुष तर ११ महिला कर्मचारी आहेत. ६६ ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांची ६६ पदे असणे गरजेचे असताना केवळ ४२ कार्यरत आहेत. एक ग्रामविकास अधिकारी व तीन ग्रामसेवकांची पदे रिक्त आहेत. ३३ ग्रामसेवकांना दोन ते तीन गावांचा कारभार सांभाळावा लागतो. जर एखादा ग्रामसेवक रजेवर गेला, तर त्याही गावाचा कारभार अतिरिक्त दिला जातो. त्यामुळे कोणत्या ग्रामपंचायतीकडे कधी हजर रहायचे, यासाठी त्या ग्रामसेवकाला वार ठरवून घ्यावा लागतो. त्यामुळे गावातील दैनंदिन कामांना पर्यायाने दिरंगाई होते. एखाद्या व्यक्तीला एखाद्या प्रमाणपत्राची तातडीची गरज असेल, तेव्हा त्यांची मोठी अडचण होते. ठरलेल्या दिवसाची प्रतीक्षाच नागरिकांना करावी लागते. शिवाय, दोन-तीन गावांचा एका कर्मचाऱ्यावर अतिरिक्त भार पडल्यामुळे तो कर्मचारी त्रासून जातो. त्याने कोणत्या गावी वास्तव्य करावे, हाही त्याच्यासमोर प्रश्न उभा असतो.
सेवाज्येष्ठतेचा नियम शिथिल करा...
निवाडा-आंदलगावचे ग्रामसेवक ए.सी. उस्तुर्गे यांच्याकडे २२ डिसेंबर २००४ पासून याच गावचा पदभार आहे. त्यांच्याबाबत ग्रामस्थांकडून अनेक तक्रारी असतानाही त्यांची बदली होत नाही. तर दिवेगाव, माकेगाव, नरवटवाडीचे एस.ए. पवार, रामवाडीचे एस.व्ही. गुडे, तळणीचे राठोड हे ग्रामसेवकही आठ-आठ वर्षांपासून त्याच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांनी जर विनंती अर्ज केला तरच त्यांची बदली होते, असे समजते.
सेवाज्येष्ठता नियम बदलीसाठी आड येतो, असे सांगण्यात येते. त्यामुळे हा नियम शिथिल करावा, अशी मागणी सरपंचांकडून केली जात आहे.