ग्रामसेवक, उपसरपंचास अटक,जामीन
By Admin | Updated: September 6, 2014 00:27 IST2014-09-06T00:21:10+5:302014-09-06T00:27:52+5:30
मुखेड: गाव तंटामुक्त अभियानातून बक्षीसरुपाने मिळालेले दोन लाख रुपये हडप करणाऱ्या सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्षांसह ग्रामसेवकांवर १९ महिन्यांपूर्वी न्यायालयाच्या आदेशाने गुन्हे नोंदविण्यात आले.

ग्रामसेवक, उपसरपंचास अटक,जामीन
मुखेड: गाव तंटामुक्त अभियानातून बक्षीसरुपाने मिळालेले दोन लाख रुपये हडप करणाऱ्या सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्षांसह ग्रामसेवकांवर १९ महिन्यांपूर्वी न्यायालयाच्या आदेशाने फौजदारी गुन्हे नोंदविण्यात आले. पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे़
२०१२ मध्ये तालुक्यातील डोंगरगाव ग्रामपंचायतीला तंटामुक्त अभियानातून २ लाख ३५ हजारांचे बक्षीस मिळाले होते़ ही रक्कम गावच्या विकास योजनेसाठी खर्च करायची होती़ पण सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामसेवकांनी बनावट ग्रामसभेचा ठराव घेवून या रकमेतून गावात पथदिवे बसविण्यात आल्याचे ठराव घेवून व पुणे येथील निर्मल पॉवर कंपनीकडून पथदिवे बसविण्याचे काम करण्यात आल्याचे कंपनीचे खोटी बिले व शपथपत्र सादर करून २ लाख रुपये बँकेतून परस्पर उचलले़ याबाबत डोंगरगावातील नागरिक बडदू जैनोद्दीन सय्यद यांनी पोलिसांकडे तक्रार केली, मात्र दखल घेण्यात न आल्याने त्यांनी तहसीलदारांकडे धाव घेतली. तहसीलदारांनी दिलेल्या आदेशान्वये पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविले. याप्रकरणी तहसीलदार यांनी चौकशी केली असता ग्रामसेवकांनी पथदिवे व लावताच २ लाख रुपये उचलल्याचे व सदर रक्कम उपसरपंच राजू धनगे यांच्याकडे दिल्याचे शपथपत्रकाद्वारे कबूल केले असता तहसीलदाराने तंटामुक्तीच्या पैशात अपहार करणाऱ्याविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश मुखेड पोलिसांना दिले़
पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने फिर्यादी सय्यद याने अॅड़एस़ एस़ गोपछडे यांच्यामार्फत मुखेड न्यायालयात याचिका दाखल केली होती़ न्यायालयाच्या आदेशाने ९ डिसेंबर २०१३ रोजी आरोपी राजू धनगे (विद्यमान उपसरपंच), राजाबाई गवाले (तत्कालीन सरपंच), खातीजाबी आजमोद्दीन (तत्कालीन उपसरपंच), बाबू हैदर सय्यद (तंटामुक्ती अध्यक्ष), शेख हुसेन चाँदसाब (तत्कालीन ग्रामसेवक) यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते़ पण गुन्हे दाखल होवूनही आरोपी मोकाटच असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश देताच यातील आरोपी राजू धनगे, ग्रामसेवक व तंटामुक्ती अध्यक्ष यांना अटक करण्यात आली़
या तिघांना तपासासाठी पोलिस कोठडी मिळण्यासाठी न्यायालयासमोर उभे केले असता पोलिस प्रशासनाने आरोपींना अटक करण्यास दिरंगाई केल्याने आरोपींना न्यायालयाने जामीन दिला़ (वार्ताहर)