सातशे गावांत होणार ग्रामसभा
By Admin | Updated: August 15, 2014 00:01 IST2014-08-14T23:16:58+5:302014-08-15T00:01:58+5:30
परभणी : स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामसभेमध्ये ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे.

सातशे गावांत होणार ग्रामसभा
परभणी : स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामसभेमध्ये ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या ग्रामसभेतून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात येणार असून काही महत्त्वाचे ठरावही पारित केले जाणार आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी तसेच ग्रामपंचायतीशी निगडित लोकोपयोगी विषयांवर चर्चा घडवून आणण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे यांनी दिल्या आहेत.
या ग्रामसभेमध्ये ग्रामीण जीवन ज्योती अभियानांतर्गत जे बचतगट दारिद्र्य रेषेखालील नाहीत. परंतु, आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत, अशा गटांची निवड करुन ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत संबंधित गटांना लाभ देण्यासाठी हे प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठविण्याचे नियोजन केले जाणार आहे. इंदिरा आवास योजनेअंतर्गत २०१४-१५ मध्ये मान्यतेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे ग्रामसभेत वाचन केले जाणार आहे. त्याच प्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २०१५-१६ चे लेबर बजेट व वार्षिक नियोजन केले जाणार आहे. ग्रामसभेची संपूर्ण कार्यवाही, सामाजिक लेखापरिक्षण आणि बैठक व्यवस्थापन या अज्ञावलीमधून करणे, ग्रामपंचायत संग्राम केंद्रातून द्यावयाच्या विविध बँकिग सेवा, इतर दाखले, मोबाईल, डीटीएच रिचार्ज, पॅन कार्ड, बस तिकीट, आरक्षण आदी विषयांची माहिती या सभेद्वारे दिली जाणार आहे.(प्रतिनिधी)
स्वस्त धान्य परवान्यांचा होणार ठराव
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्वयंसहाय्यता गटांना स्वस्त धान्य दुकान व किरकोळ केरोसीन परवाने मंजूर करण्यासाठी विशेष महिला ग्रामसभेमध्ये ठराव पारित करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे गावनिहाय यादीनुसार वाळू लिलावामधील रेती उत्खनानासाठी ग्रामसभेचा शिफारस ठरावही पारित केला जाणार आहे.
या ग्रामसभेत निर्मल भारत अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, राष्ट्रीय आवास योजना, पाणी साठवा, गाव वाचवा आदी योजनांची माहिती ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या ग्रामसभेत दिली जाणार आहे.