सिरळी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हजेरीत ग्रामसभा
By Admin | Updated: July 13, 2014 00:29 IST2014-07-12T23:50:25+5:302014-07-13T00:29:28+5:30
वसमत: तालुक्यातील सिरळी येथे शुक्रवारी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली.

सिरळी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हजेरीत ग्रामसभा
वसमत: तालुक्यातील सिरळी येथे शुक्रवारी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत ग्रामस्थांनी गाव कुरूंद्याला जोडण्यासाठी खांबाळा रस्ता तयार करून द्यावा, तीन कि.मी. रस्ता बांधकाम झाले तर २० कि.मी.चे अंतर कमी होवून सिरळी मुख्य प्रवाहास जोडले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना पटवून दिले.
शुक्रवारी सायंकाळी सिरळी येथे ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेस जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, उपविभागीय अधिकारी अनुराधा ढालकरी, तहसीलदार अरविंद नरसीकर, गटविकास अधिकारी साहेबराव कांबळे, डावरे, वीज वितरण कंपनीचे उपअभियंता अनसिंगकर, सरपंच सीमा नलगे, उपसरपंच नागोराव जांबुतकर यांच्यासह तालुकास्तरावरील विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी हजर होते.या ग्रामसभेचे प्रास्ताविक तहसीलदार अरविंद नरसीकर यांनी केले. यावेळी त्यांनी प्रशासन ग्रामस्थांच्यादारी आले आहे. या ग्रामसभेद्वारे गावाच्या समस्या सोडवण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी सिरळी गाव आडरस्त्याला आहे. मुख्य बाजारपेठेशी जोडणारा जवळचा रस्ता नाही. सर्कलचे गाव कुरूंदा असले तरी ३५ कि.मी. अंतर पार करावे लागते. यासाठी खांबाळा रस्ता तयार करून द्यावा, हा रस्ता झाला तर अंतर २० कि.मी. कमी होवू शकते, यासाठी हा रस्ता त्वरीत व्हावा, अशी एकमुखी मागणी केली. या शिवाय आदिवासी बहुल गाव सिरळीस ठक्कर बाबा योजना लागू करावी आदी मागण्या केल्या. (वार्ताहर)