ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील वातावरण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:12 IST2021-01-08T04:12:13+5:302021-01-08T04:12:13+5:30
वैजापूर : १०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीने तालुक्यातील ग्रामीण भागाचे राजकीय वातावरण तापले आहे. चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रचाराचा जोर वाढला ...

ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील वातावरण तापले
वैजापूर : १०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीने तालुक्यातील ग्रामीण भागाचे राजकीय वातावरण तापले आहे. चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रचाराचा जोर वाढला असून, गावागावांत प्रचाराचा धुराळा उडत आहे.
१५ जानेवारी रोजी तालुक्यातील ३१५ मतदान केंद्रावर मतदान होणार असून, निवडणूक रिंगणात १ हजार ६३० उमेदवार राहिले आहेत. १०५ ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायती व २० प्रभाग मिळून २०४ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे ७०३ जागांसाठी १ हजार ६३० उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. एकूण मतदार संख्या १ लाख ७४ हजार २९६ पैकी ९४ हजार १०७ पुरुष, तर ८० हजार १८९ महिला मतदार आहेत. सर्वात कमी वयोगटातील युवकांची संख्या ६० टक्क्यांच्या आसपास आहे. तर दहा टक्के वयाची पन्नासी गाठणारे आहेत. तालुक्यातील वैजापूर ग्रामीण एक, सावखेडखंडाळा, नायगव्हाण वळण, पोखरी, तलवाडा, चिंचडगाव, कांगोनी नारायणपूर, भादली, साफियाबादवाडी या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. याशिवाय टाकळीसागज, मालेगाव कन्नड साळेगाव, टेंभी कऊटगाव, बाभूळखेडा खिर्डी, चिकटगाव, पानवी खुर्द, फकिराबादवाडी, भालगाव, अलापूरवाडी, सुदामवाडी, भऊर, जिरी मनोली, हिंगोणी, डोणगाव व लाखगंगा या ग्रामपंचायतींमधील एकूण २० प्रभागातील सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
६५ पॅनेल मैदानात
गावगाड्यांच्या राजकारणात तरुणांची उमेदवारी लक्षवेधक ठरणार आहे. काही ठिकाणी सरळ दुरंगी व काही ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये ६५ पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.
फोटो कॅप्शन : वैजापूर ग्रामीण एका ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आल्याने जल्लोष करताना कार्यकर्ते.