ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा सोशल मीडियात धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:09 IST2021-01-13T04:09:53+5:302021-01-13T04:09:53+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा बुधवारी सायंकाळी पाच वाजता थांबणार आहे. दरम्यान, सोशल मीडियातून उमेदवार धुमाकूळ घालत ...

ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा सोशल मीडियात धुमाकूळ
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा बुधवारी सायंकाळी पाच वाजता थांबणार आहे. दरम्यान, सोशल मीडियातून उमेदवार धुमाकूळ घालत असून त्यावर कुणाचेही निर्बंध नाहीत. तहसील पातळीवर निवडणुकीचे नियंत्रण असल्यामुळे ग्रामीण भागापर्यंत दक्षता घेण्यात अनेक अडचणी आल्या. उमेदवारांचे वर्गीकरण, खर्च, आचारसंहितेचे उल्लंघन, महिला उमेदवारांचा आकडा, एकूण मतदार याबाबत कुठलीही अंतिम माहिती जिल्हा कार्यालयाकडे आरओ पातळीवर आज अखेरपर्यंत आली नाही. ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी ५ जानेवारीपासून खऱ्या अर्थाने सुरू झाली. उमेदवारी मागे घेणे, निवडणूक प्रचारचिन्हे मिळाल्यानंतर सर्व पॅनल आणि उमेदवारांनी दणकून प्रचाराला लागण्याचे नियोजन केले. सरपंच पदासाठी निवडणुकीनंतर आरक्षण सोडत असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतीत सुमारे सहा हजारांपेक्षा अधिक महिला उमेदवार असल्याची प्राथमिक माहिती आहे. जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील एकूण २०९० प्रभाग आणि २२६१ मतदान केंद्रांवर १५ रोजी मतदान होणार आहे. मतदान केंद्रांत वैजापूर ३१५, सिल्लोड ३३६, कन्नड ३१२, पैठण ३२१, औरंगाबाद ३१६, गंगापूर २८७, फुलंब्री १७१, सोयगाव ११४, खुलताबाद ८९ केंद्रांचा समावेश आहे.
२ हजार ९० प्रभागांतील ५ हजार ६८३ सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतून तब्बल १६ हजार ९५७ जणांनी अर्ज दाखल केले होते. ५ हजार ५४८ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. वैजापूर तालुक्यात १६३०, सिल्लोडमध्ये १५०९, कन्नड १५१२, पैठण १७३२, औरंगाबाद १४४५ तर गंगापूर तालुक्यात १४४८ उमेदवार रिंगणात आहेत.
चाैकट
निवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायती किती?
६१७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत.
एकूण प्रभाग २०९० प्रभाग पूर्ण ग्रामपंचायतींमध्ये
रिंगणात उमेदवार किती ?
निवडणुक रिंगणात ११ हजार ४९९ उमेदवार आहेत.
मतदान केंद्रांची संख्या
जिल्ह्यात २ हजार २६१ मतदान केंद्रे आहेत.
तालुकानिहाय निवडणुका
वैजापूर १०५,
सिल्लोड ८३,
कन्नड ८३,
पैठण ८०,
औरंगाबाद ७७,
गंगापूर ७१,
फुलंब्री ५३,
सोयगाव ४०
खुलताबादमध्ये २५