हरभरा डाळ @130 रु.किलो
By Admin | Updated: October 8, 2016 01:12 IST2016-10-08T01:03:14+5:302016-10-08T01:12:06+5:30
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद ऐन दसरा-दिवाळीच्या तोंडावर हरभरा डाळीने किलोमागे १३० रुपयांपर्यंत मजल मारली. पहिल्यांदाच या डाळीच्या भावाने उच्चांक गाठला आहे

हरभरा डाळ @130 रु.किलो
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद
ऐन दसरा-दिवाळीच्या तोंडावर हरभरा डाळीने किलोमागे १३० रुपयांपर्यंत मजल मारली. पहिल्यांदाच या डाळीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. हरभरा डाळीपासून तब्बल १२० पदार्थ तयार होतात. परिणामी, पुन्हा महागाई बोकळणार, यामुळे सर्वसामान्यांचे डोळे पांढरे झाले आहेत.
फेब्रुवारी महिन्यात ६० ते ६५ रुपये प्रतिकिलो विकणारी हरभरा डाळ सध्या दुप्पट भावात विक्री होत आहे. एरव्ही ५५ ते ६० रुपयांदरम्यान मिळणारी व डाळीमध्ये सर्वात स्वस्त डाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरभरा डाळीने पहिल्यांदाच १०० रुपयांचा आकडा पार केला आहे.
मार्च महिन्यापासून डाळीच्या भावात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली होती. मागील आठवडाभरात किलोमागे २० रुपयांनी भाव वधारले. व्यापाऱ्यांनी सांगितले की, न भूतो न भविष्यती अशी हरभरा डाळीत तेजी आली आहे. देशात महाराष्ट्र, मध्यप्रदेश व राजस्थान या तीन राज्यांत हरभऱ्याचे उत्पादन होते. मात्र, महाराष्ट्रात मागील तीन वर्षांपासून दुष्काळ असल्याने त्याचा फटका यंदा हरभरा डाळीला बसला आहे. कमी उत्पादनामुळे भाववाढ झाल्याचे सांगितल्या जात आहे. हरभरा डाळ देशातील काही बड्या साठेबाजांच्या हातात असल्याने ही कृत्रिम भाववाढ झाली असल्याचा आरोप मोंढ्यातील काही व्यापाऱ्यांनी केला. कमिशन एजंट प्रकाश जैन यांनी सांगितले की, आॅस्ट्रेलियातून नवीन हरभऱ्याची आवक नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.