पदवीधर पदोन्नती प्रक्रिया पुन्हा आजपासून
By Admin | Updated: July 25, 2014 00:48 IST2014-07-25T00:37:46+5:302014-07-25T00:48:31+5:30
औरंगाबाद : पदवीधर पदोन्नती स्वीकारण्यास शिक्षकांनी अनिच्छा दर्शविताच पदोन्नतीची प्रक्रिया अर्ध्यावरच बंद करण्याचा शिक्षण विभागाने घेतलेला निर्णयआंदोलनाचा इशारा देताच पुन्हा फिरविला

पदवीधर पदोन्नती प्रक्रिया पुन्हा आजपासून
औरंगाबाद : सोयीच्या जागा मिळत नसल्यामुळे पदवीधर पदोन्नती स्वीकारण्यास शिक्षकांनी अनिच्छा दर्शविताच पदोन्नतीची प्रक्रिया अर्ध्यावरच बंद करण्याचा शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय शिक्षक सेनेने आंदोलनाचा इशारा देताच गुरुवारी पुन्हा फिरविला. त्यामुळे उद्यापासून (शुक्रवार) दोन दिवस ही प्रक्रिया पुन्हा राबविण्यात येईल, असे शिक्षण विभागातर्फे कळविण्यात आले.
आरटीई कायद्यानुसार नवीन पदनिर्धारणात मराठी माध्यमाच्या १,२३० व उर्दू माध्यमांच्या ७४ पदवीधर शिक्षकांच्या जागा निर्माण झाल्याने शिक्षण विभागाने २,१७४ शिक्षकांना पदोन्नती प्रक्रियेसाठी निमंत्रित केले होते; परंतु १,३२४ सेवा ज्येष्ठ शिक्षकांनी पदवीधर पदोन्नती नाकारल्याने दुर्गम भागातील ४५४ जागा रिक्त राहिल्या होत्या.
कनिष्ठ शिक्षक पदोन्नती स्वीकारण्यास तयार असताना शिक्षण विभागाने अचानक ही प्रक्रिया बंद केली. त्याला शिक्षक सेनेचे प्रभाकर पवार, दीपक पवार, सदानंद माडेवार, संतोष आढाव, प्रभाकर गायकवाड, लक्ष्मण ठुबे, भगवान हिवाळे यांनी विरोध करून शासन निर्णयानुसार प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला होता.
पदवीधर पदोन्नतीची प्रक्रिया दोन दिवस चालणार असून, प्रत्येक दिवशी ५०० शिक्षकांना त्यासाठी बोलावले असल्याचे उपशिक्षणाधिकारी सरताज खान यांनी सांगितले.
सहावी ते आठवीपर्यंत शिक्षकच पदवीधर हवा
शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता सहावी ते आठवीसाठी पदवीधर शिक्षक देणे अनिवार्य आहे. जिल्हा परिषदेने पदोन्नती प्रक्रिया सहा दिवस राबवून बंद केली होती. त्यासाठी मराठी माध्यमांच्या २,१०० आणि उर्दू माध्यमांच्या ७४ शिक्षकांना प्रशासनाने निमंत्रित केले होते.
मराठीच्या ८१० व उर्दूच्या ४० जागा भरल्या आहेत. त्यात गणित व विज्ञान विषयासाठी केवळ ४८ शिक्षक सापडले असून, भाषा विषयांचे ४१३ आणि सामाजिकशास्त्राच्या ३४८ शिक्षकांचा समावेश आहे.
मराठी माध्यमांच्या तब्बल १,३०४ शिक्षकांनी पदोन्नती नाकारली, तर उर्दूच्या ३४ शिक्षकांनी ही संधी घेतली नाही.