पदवीधर पदस्थापनेची प्रक्रिया नव्याने होणार
By Admin | Updated: July 23, 2014 00:20 IST2014-07-22T23:39:26+5:302014-07-23T00:20:43+5:30
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना प्राथमिक पदवीधरची पदस्थापना देण्यासंदर्भात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया आता संपूर्णपणे नव्याने करण्याचा निर्णय
पदवीधर पदस्थापनेची प्रक्रिया नव्याने होणार
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना प्राथमिक पदवीधरची पदस्थापना देण्यासंदर्भात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया आता संपूर्णपणे नव्याने करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यातील १८७ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना प्राथमिक पदवीधरची पदस्थापना देण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता. यासंदर्भात तालुकास्तरावरून प्रस्ताव मागविण्यात आले. त्यानुसार पदवीसह बीएडची पदवी मिळविलेल्या शिक्षकांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी आठ दिवसांपूर्वीच बीएडचा निकाल लागलेल्या मुक्त विद्यापीठाच्या शिक्षकांनाही या प्रक्रियेत संधी हवी होती. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारीच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे अधिकार वापरून तालुकास्तरावरच शिक्षकांना पदस्थापना देत असल्याचे व यामुळे घोडाबाजार वाढल्याचे वृत्त २२ जुलै रोजी ‘लोकमत’ ने प्रसिद्ध केले. याच विषयावर मंगळवारी सकाळी शिक्षण आयुक्तांनी राज्यातील सर्व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची व्हीडिओ कॉन्फरंस घेतली. त्यामध्ये यासंदर्भात वेगवेगळ्या सूचना देण्यात आल्या. संपूर्ण राज्यस्तरावर ही प्रक्रिया एकाच पद्धतीने व्हावी, असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यात यापूर्वी सुरू करण्यात आलेली पदवीधर पदस्थापनेची प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे यांनी घेतला आहे. आता ही संपूर्ण प्रक्रियाच आता नव्याने पार पाडली जाणार आहे. त्यासाठी राज्यस्तरावरून सूचना येणार आहेत. त्यानंतरच प्राथमिक पदवीधर शिक्षकांना पदस्थापना देण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेला आता वेळ लागण्याची शक्यता आहे.
आता पदवीधारकांनाही संधी
यापूर्वीच्या प्रक्रियेत पदवीनंतर बीएड उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना पदवीधरची पदस्थापना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र या निर्णयामध्ये लवचिकता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे फक्त पदवी मिळविलेल्या शिक्षकांनाही आता पदवीधरची पदस्थापना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा शिक्षकांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी या शिक्षकांमधून पदवीधरची पदस्थापना देण्याकरीता गुणवत्तापूर्व शिक्षकांची परीक्षेद्वारे निवड करण्याची संधी जिल्हा परिषदेकडे आहे. त्यामुळे आता परीक्षेद्वारेच पदोन्नतीसाठी शिक्षकांची निवड करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
कळमनुरीत १५ जणांचे आक्षेप
कळमनुरी तालुक्यातील ४९ पदवीधर शिक्षकांना पदस्थापना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी मंगळवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत १५ जणांनी आक्षेप नोंदविले आहे. याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी एस.बी. सोनुने यांनी सांगितले.