ग्रा.पं. निवडणुकीसाठी बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:51 IST2017-10-07T00:51:53+5:302017-10-07T00:51:53+5:30
जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील २२४ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी मतदान होत आहे. निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे

ग्रा.पं. निवडणुकीसाठी बंदोबस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील २२४ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी मतदान होत आहे. निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. संवेदनशील २३ गावांमधील मतदान केंद्रावर बंदूकधारी जवान तैनात करण्यात आले आहेत. शुक्रवारी निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी मतपेट्या घेऊन मतदान केंद्रावर रवाना झाले.
जिल्ह्यात दुसºया टप्प्यातील २३२ पैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, शनिवारी २२४ ग्रामपंचायतींसाठी ७११ केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. सरपंच पदाच्या २२४ जागांसाठी ६८८ तर सदस्यपदाच्या दोन हजार ३६१ जागांसाठी ३५७२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाने महसूल विभागाचे ५१ झोन तयार केले आहेत. या सर्व झोनमध्ये पेट्रोलिंगसाठी ५१ सेक्टर तयार करण्यात आले असून, प्रत्येक तालुक्यासाठी एक स्ट्राँगरुम तयार करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी निवडणुकीच्या काळात दाखल गुन्ह्यातील आरोपी, समाजकंटक व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक बंदोबस्तासाठी पाच पोलीस उपअधीक्षक, १० पोलीस निरीक्षक , ५१ सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक, एक हजार १६५ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये नाशिक, औरंगाबाद पोलीस आयुक्तालय आणि विभागाच्या वनसरंक्षक जवानांचा समावेश आहे. त्याचबरोबर हिंगोली येथील राज्य राखीव दलाची एक तुकडी, पोलीस नियंत्रण कक्षात चार दंगा नियंत्रण पथके व दोन जलद कृती दलाची पथके राखीव ठेवली आहेत. बंदोबस्ताच्या अनुषंगाने आवश्यक सर्व तयारी झाल्याचे पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी सांगितले.