गोविंदांचा थरार
By Admin | Updated: August 19, 2014 02:18 IST2014-08-19T02:06:41+5:302014-08-19T02:18:11+5:30
औरंगाबाद : बघ सरसर, पहिला, दुसरा अन् तिसराही मनोरा. डोळ्याचे पाते लवते न लवते तोवर थरावर थर. थरागणिक उंचावणाऱ्या नजरा आणि आधाराचे हातही.

गोविंदांचा थरार
औरंगाबाद : बघ सरसर, पहिला, दुसरा अन् तिसराही मनोरा. डोळ्याचे पाते लवते न लवते तोवर थरावर थर. थरागणिक उंचावणाऱ्या नजरा आणि आधाराचे हातही. तोच सटकली रे, सटकली...चा होरा अन् चढलेले मनोरे क्षणार्धात जमीनदोस्त. पुन्हा डीजेचा दणदणाट. ‘गोविंदा रे गोपाला’च्या जोडीला ‘ही पोळी नाजूक तुपातली’ची झिंग घेऊन बेभान नाचणारी तरुणाई. प्रमुख चौक, रस्ते व गल्लीबोळातून दर दोन- पाच मिनिटांनी होणाऱ्या या पुनरावृत्तीने चैैतन्याच्या उत्साहात अवघे शहर न्हाऊन निघाले.
शहरातील अवघी तरुणाईच गोविंदाच्या रूपात रस्त्यावर अवतरली. रंगीबेरंगी टी शर्ट. त्यावर नोंदवलेली मंडळांची नावे. कपाळावर गोविंदाच्या केशरी पट्ट्या. त्यावर मोरपीस. हाती जरीपटका. मुखी ‘गोविंदा, गोविंदा’ची बेंबीपासून दिलेली हाक. चेहऱ्यावर भरभरून वाहणारा उत्साह. चालणेही नृत्यातच. एकमेकांच्या खांद्यावर स्वार होऊन निघालेल्या स्वाऱ्या. एकूणच वातावरण तरुण झाले होते. भारावले होते.
दहीहंडीचा शहरात सर्वत्र जल्लोष होता. गुलमंडी, औरंगपुरा, त्रिमूर्ती चौक, उस्मानपुरा, सिडको व टीव्ही सेंटर, पुंडलिकनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा भागात दहीहंडीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. लहान गल्लीबोळातूनही बालगोविंदांचा उत्साह अमाप होता. डीजेच्या आवाजामुळे गुलमंडी परिसर दणाणून गेला होता. रंगीबेरंगी लाईटच्या प्रकाशझोतात गोविंदा खुलून दिसत होते. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या उत्सवात सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सक्रिय सहभागी झाल्याने उत्साहाची रंगत अधिकच वाढली होती.
रस्ते बंद
प्रमुख चौकात भव्य मंच उभारून दहीहंडीचे आयोजन केल्यामुळे शहरातील अनेक रस्ते बंद करण्यात आले होते. कॅनॉट प्लेस, गुलमंडी, टीव्ही सेंटर चौकातून होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती.
कॅनॉट प्लेस भागातील स्वाभिमान क्रीडा मंडळातर्फे आयोजित भव्य दहीहंडी महोत्सवाला दुपारी २ वाजताच प्रारंभ झाला. त्याअगोदरच गोविंदा पथकांनी गर्दी केली होती. भव्य मंच आणि हृदय दडपवणारा डीजे. सूर्यनारायण काहीसा कलला व गोविंदा पथकांचा थरथराट सुरू झाला. जुन्या मोंढ्यातील रोहिदास गोविंदा पथकाने पहिली सलामी दिली. टाळ्याचा कडकडाट झाला. ‘हत्ती, घोडा, पालखी- जय कन्हैया लाल की’चा जयजयकार घुमला. थरावर थर चढत होते. काही क्षणात सहा थर लागले. पुन्हा ‘गोपाल कृष्ण की’ निनादले.
भाविक, बघ्यांच्या नजरा सर्वात वरच्या थरावरील बालगोविंदावर स्थिरावल्या. श्वास रोखले. अरेरे, त्याचा तोल ढळला. तोच ‘सटकला रे’चा आणखी आवाज. बालगोविंदा हात उंचावत हवेत पवनपुत्रासम विहार करीत होता. मंडळाने संपूर्ण ‘लाईफ सपोर्ट’ यंत्रणा वापरली, तर उपस्थितांनी पुन्हा घोषणाबाजी केली. घोषणाबाजीने स्फुरण चढल्यागत बालगोविंदा ‘हवेत तरंगतच नृत्यात भान विसरला असतानाच जमिनीवर आला. ढोल- ताशे कडाडले. डीजेने ‘मच गया शोर’ची धून आळवली. नृत्यस्फोट झाला. पाच तासांच्या झंझावाती उत्साह सोहळ्यात जय राणा, श्रीरामराज्य, सिद्धीविनायक, हरहर महादेव, बालाजी हितोपदेश, रणयोद्धा, पावन गणेश, जयभद्रा, विघ्नहर्ता, हरिओम, उत्तरमुखी, श्री वाल्मिकी, राजयोग, शिवशक्ती, श्रीकृष्ण, गोगानाथ, पंचशील, वीर बलराम, जबरे हनुमान आदी ३० गोविंदा पथकांनी येऊन दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे उभारले.
दहीहंडी फोडण्यासाठी फक्त गोविंदा पथकच नव्हे, तर गोपिका पथकही आले. धुणी- भांडी करणाऱ्या शहरातील काही महिलांनी एकत्र येऊन तयार केलेल्या ‘जय मल्हार’ गोपिका पथकाने चार थर रचन्याची किमया केली. त्यांचा उत्साह व धाडसाचे उपस्थितांनी कौतुक करून टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
गोविंदा पथकाची धावाधाव
४कॅनॉट प्लेस येथे स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या दहीहंडीला दुपारी २ वाजता प्रारंभ झाला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील दहीहंडी कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यामुळे गोविंदा पथक एका ठिकाणाहून दुसऱ्या स्थळी जाण्यासाठी धावाधाव करीत होते. त्यासाठी या पथकांनी स्वतंत्र टेम्पो व वाहने केली होती. दहीहंडीला सलामी देऊन पथके पुढच्या ठिकाणी रवाना होत होती. सहभागासाठी प्रत्येक मंडळांनी गोविंदा पथकांना काहीना काही रोख रक्कम देऊन पथकांचा सन्मान केला होता.