शासकीय कार्यालये घाणीच्या विळख्यात
By Admin | Updated: August 4, 2014 00:50 IST2014-08-04T00:38:22+5:302014-08-04T00:50:31+5:30
उस्मानाबाद : शहरातील जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,
शासकीय कार्यालये घाणीच्या विळख्यात
उस्मानाबाद : शहरातील जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर कार्यालयांना कचराकुंडीचे स्वरूप आले आहे़ या कार्यालयांच्या भिंतींना पिचकाऱ्यांचे रंग चढू लागले असून, एकीकडे स्वच्छतेचा जयघोष करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कार्यालये स्वच्छ ठेवण्याकडेच दूर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे़
शहरातील रोहयो उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेटच्या बाजूला भिंतीवर थुंकुन-थुंकून रंग चढविण्यात आला आहे़ या परिसरातील स्वच्छतागृहाचे काम अपूर्ण असल्याने तलाठी कार्यालयाच्या बाजूला उघडयावर लघू शंका केली जात आहे़ पंचायत समितीच्या कार्यालयातील अनेक खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत़ तर आतमध्ये भिंतींचे कोपरे रंगले आहेत़ विशेष म्हणजे यात काही अधिकारी, कर्मचारी आघाडीवर असल्याचे दिसून येते़
जिल्हा परिषद इमारतीतील अवस्थाही काही वेगळी नाही़ स्वच्छतागृहामध्ये घाणीचे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना तोंडाला रुमाल बांधून जावे लागते़ वरिष्ठांना याबाबत सांगूनही सफाईकडे दूर्लक्ष केल्याचे कर्मचारी सांगतात़ तसेच तेथील रविवारी कार्यालयाला कुलूप लवणे आवश्यक असताना काही कार्यालये सताड उघडी असल्याचे दिसून आले़ तर पाण्यासाठी बसविण्यात आलेले फ्रिज बंद पडले आहे. अधिकाऱ्यांच्या स्वच्छतागृहामध्ये खुर्च्या व टेबल ठेवण्यात आले आहेत़ मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ३५ ते ४० शासकीय कार्यालय आहेत. दुमजली इमारतीतील अस्वच्छतेचा पाडा कायम आहे़ इमारतीच्या खिडक्या, कोपऱ्याला दारुच्या बाटल्या सर्रास दिसून आल्या. स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य कायमचेच आहे़ तर बहुतांश ठिकाणी विद्युत तारांच्या वायरांबाबत आवश्यक ती काळजी घेतली नसल्याचे दिसून आले़ राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाची कागदपत्रे व्हरांड्यात ठेवण्यात आली आहेत़ ही कागदपत्र कोणीही घेवून जावू शकतो. विशेष म्हणजे या इमारतीत एकही सुरक्षा रक्षक दिसून आला नाही़
लाखोची वाहने भंगारात..
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, प्रशासकीय मध्यवर्ती या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाडया खराब झाल्याने कार्यालयाच्या आवारात उभा करण्यात आल्या आहेत़ जिल्हा परिषद इमारतीच्या पाठीमागे दोन ते पाणी टँकर, तीन ते चार गाडया कुजत भंगारागत अवस्थेत जात आहेत़
पिण्याचे पाणी नाही
शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नसल्याचे दिसून आले. तसेच तेथील कर्मचारी व अधिकाऱ्यांना पाणी पिण्यासाठी बाहेरच्या हाटेल व अथवा कॅन्टीनचा आधार पाणी पिण्यासाठी घ्यावा लागतो. मध्यवती प्रशासकीय इमारतीमधील काही स्वच्छतागृहांना कायमचे कुलूप लावण्यात असल्याने येथे येणाऱ्या नागरिकांसह महिलांची मोठी कुचंबणा होते़