पाणंदमुक्त गावांनाच शासनाचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2015 00:28 IST2015-05-25T00:12:19+5:302015-05-25T00:28:10+5:30
लातूर : शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणारा निधी हा आता पाणंदमुक्त गावातच खर्च करण्यात आहे़

पाणंदमुक्त गावांनाच शासनाचा निधी
लातूर : शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणारा निधी हा आता पाणंदमुक्त गावातच खर्च करण्यात आहे़ त्यामुळे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता गावाच्या पाणंदमुक्तीकडे विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे़ परिणामी, अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला शासनानेच चाप लावला आहे़
लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने मिशन स्वच्छ भारत राबविण्यात येत आहे़ ‘मिशन स्वच्छ भारत’ अंतर्गत जिल्हाभरात स्वच्छतेचा जागर करण्यात येत आहे़ शौचालय नसतील तर ते बांधून घ्यायला लावणे, त्यासाठी शासनाचे अनुदान उपलब्ध करून देणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, कचरा व्यवस्थापन करणे, तसेच पाणंदमुक्त गावात वाढ करणे आदी योजना प्रभावी पद्धतीने राबविण्याचे काम करण्यात येत आहे़ गावागावांत स्वच्छतेचे महत्व पटवून देणे़ नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्व पटवून देवून ज्यांच्याकडे शौचालय नसतील, अशा गावकऱ्यांना शौचालय बांधणीसाठी प्रोत्साहित करून त्यांना शौचालय बांधायला लावणे़ शौचालयाचा वापर का करावा तसेच उघड्यावर शौचास गेल्यामुळे होणारे रोग याबाबत प्रबोधन करणे अशा सर्व बाबी या विभागामार्फत राबविल्या जातात़ शाळेतील विद्यार्थ्यांना, निरक्षर नागरिकांना स्वच्छतेचे व आरोग्य सुरक्षिततेचे महत्व पटवून देण्याचे काम हा विभाग करीत आहे़ ज्या नागरिकांकडे शौचालय नाहीत किंवा त्यांची आर्थिक कुवत नसेल तर त्याबाबत राज्य व केंद्र शासनाच्या अनुदानबाबतची माहिती लाभार्थ्यांना देऊन त्यांना शैचालयाला मिळणारे अनुदान उपलब्ध करून देण्याचे कामही सुरू आहे. त्यामुळे शौचालय बांधणीकडे कल वाढला आहे़ (प्रतिनिधी)