ऐतिहासिक दसरा महोत्सवाला सरकारीकरणाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:53 IST2017-09-16T00:53:40+5:302017-09-16T00:53:40+5:30
येथील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या दसरा महोत्सवाचे आता पूर्णपणे शासकीयीकरण होत असल्याने स्थानिकांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या या महोत्सवाची कोणतीच तयारी दिसून येत नाही. परिस्थिती अशीच राहिली तर यंदा ‘फ्लॉप शो’ची प्रचिती येण्याची शक्यता आहे.

ऐतिहासिक दसरा महोत्सवाला सरकारीकरणाचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या दसरा महोत्सवाचे आता पूर्णपणे शासकीयीकरण होत असल्याने स्थानिकांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या या महोत्सवाची कोणतीच तयारी दिसून येत नाही. परिस्थिती अशीच राहिली तर यंदा ‘फ्लॉप शो’ची प्रचिती येण्याची शक्यता आहे.
हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवात खर्चावरून स्थानिकांत होत असलेल्या वादामुळे मागील तीन वर्षांपासून प्रशासनाने सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून या शहराच्या या वैभवशाली परंपरेला जणू गालबोटच लागले. खर्चावरून होणाºया कुरबुरी अजून संपल्या नाहीत. प्रथम तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांच्या हाती सूत्रे आली आणि त्यांनी या महोत्सवाचे शासकीयीकरण करण्याची कोणतीच कसर सोडली नाही. आपल्याला काय करायचे? या भूमिकेतून लोकप्रतिनिधी, व्यापारी व इतरांनीही यातून अंग काढून घेतले. यात महोत्सवातील काही परंपरांना छेद दिला तरीही लोकांनी निमूटपणे सहन केले. परंतु आपल्या कामाचा व्याप सांभाळत या महोत्सवात लक्ष घालणे अधिकाºयांना जड जात होते. मग त्यातही प्रशासनाचा फायदा पाहिला जावू लागला
. महोत्सवातील हिशेबात खरेच काही गैर होत असेल तर त्यात कोणाचीही गय होता कामा नये. मात्र प्रशासनाचे सूत्रे हाती घेतली तर त्यावर नियंत्रण आणनेही त्यांचीच जबाबदारी आहे. दहा दिवसांसाठी सेवाभावीवृत्तीने एखादा चार्टड अकाउंटंटही हा कारभार पाहण्यास तयार होईल. मात्र विश्वास आणि योग्य लेखासंहितेचा अवलंब आवश्यक आहे. एकीकडे महोत्सवातून जमलेल्या रक्कमेवर शासकीय कर्मचाºयांच्या स्पर्धा व इतर बाबी प्रशासन करीत असताना स्थानिकांना याबद्दल विचारण्याचाही अधिकार नसल्याच्या अविर्भावात वागत असेल आणि त्यामुळे या परंपरेला मारक बाबींचा शिरकाव होत असेल तर हे स्थानिकांचेच अपशय म्हणावे लागेल.
यंदाच्या दसरा महोत्सवातील प्रदर्शनीची अजून कोणतीच तयारी नाही. मुख्य आकर्षण असलेल्या मोठ्या झुल्यांचाही पत्ता नाही. छोट्या झुल्यांची तेवढी बोली लिलावात झाली आहे. दसरा महोत्सवाचा फ्लॉप शो ठरणार अशा गावगप्पाही रंगत आहेत. मात्र लोकप्रतिनिधींनीही स्थानिकांना विश्वासात घेत नेमके कुठे पाणी मुरतेय? याचा शोध घेणे महत्त्वाचे वाटत नाही. या महोत्सवाचे धार्मिक महत्त्व अबाधित ठेवून लोकरंजनही तेवढीच गरजेची बाब आहे. मात्र त्यासाठी प्रयत्नच कोणी करणार नसेल तर गावगप्पा प्रत्यक्षात उतरणे अपरिहार्यच आहे.