बनावट जॉबकार्ड वापरून शासनाला लाखोंचा चुना

By Admin | Updated: July 28, 2014 00:52 IST2014-07-27T23:40:30+5:302014-07-28T00:52:46+5:30

जिंतूर : तालुक्यातील मोहखेडा येथे बनावट जॉबकार्ड वापरुन शासनाला हजारो रुपयांचा चुना लावणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक, तांत्रिक पॅनल अधिकारी व ग्रामरोजगार सेवकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल

The government chose millions by using fake jobcards | बनावट जॉबकार्ड वापरून शासनाला लाखोंचा चुना

बनावट जॉबकार्ड वापरून शासनाला लाखोंचा चुना

जिंतूर : तालुक्यातील मोहखेडा येथे बनावट जॉबकार्ड वापरुन शासनाला हजारो रुपयांचा चुना लावणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक, तांत्रिक पॅनल अधिकारी व ग्रामरोजगार सेवकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिंतूर न्यायालयाने दिले आहेत.
मोहखेडा येथे मग्रारोहयोअंतर्गत १४ लाख ५६ हजार ४७१ रुपयांचा निधी हाटकर, धनगर व बौद्ध समाजाच्या सामूहिकरित्या असणाऱ्या स्मशानभूमीच्या कामाकरीता आला होता. या निधीचा उपयोग करीत असताना मोहखेडा येथील सरपंच विनायक राठोड, ग्रामसेवक अनिल जुमडे, रोजगार सेवक बापूराव फुलारे, तांत्रिक पॅनल अधिकारी अशोक मगर यांनी संगनमत करुन बोगस, मर्जीतील जॉबकार्डधारक मजूर दाखवून निधीचा अपहार केला. याप्रकरणी तक्रारदार कैलास संतुकराव गडदे यांनी जिंतूर पोलिस व पोलिस अधीक्षक परभणी यांना लेखी तक्रार दिली. गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रार केली. परंतु, चौकशी झाली नसल्याने त्यांनी जिंतूर न्यायालयात फिर्याद दाखल केली. या संदर्भात न्यायालयाने वरील व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिंतूर पोलिसांना दिले आहेत.
या प्रकरणात गंगाराम अंभुरे यांच्या नावावर १७८२ रुपये, मीनाबाई अंभुरे यांच्या नावावर ८८२ रुपये उचलले. हे पती-पत्नी मागील कित्येक वर्षांपासून गावामध्ये राहत नाहीत. याच योजनेअंतर्गत शिवाजी बनसोडे यांच्या शेतात मातीनाला बांध करण्यात आला. या कामावर नामदेव जाधव व त्यांच्या पत्नी यांना मजूर दाखविण्यात आले आहेत व त्यांच्या नावावर ७ हजार ८१२ रुपये उचलून अपहार केला. हे दोघेही मुंबई येथे कार्यरत असून नामदेव जाधव हे एस.टी.मध्ये चालक आहेत. सदर प्रकरणात न्यायालयाने संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.(वार्ताहर)
एस.टी.चालकाच्या नावानेही उचलले पैसे
या प्रकरणात संबंधित यंत्रणेतील सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक व तांत्रिक पॅनल अधिकारी यांनी नामदेव जाधव यांच्या नावावर ७ हजार ८१२ रुपये उचलले. वास्तविक जाधव हे मागील १० वर्षांपासून एस.टी. महामंडळ वसई आगार येथे चालक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या माघारी बोगस जॉबकार्ड तयार करुन ही रक्कम उचलण्यात आली.
मुलांच्या नावावरही पैसे
सरपंच विनायक राठोड यांची दोन मुले संदीप व प्रदीप हे उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी राहतात. त्यांनाही मजूर दाखवून त्यांच्या नावावर ७ हजार ८१२ रुपये उचलून अपहार केला. या दोन्ही प्रकरणात न्यायालयाला सबळ पुरावा दिसल्याने न्यायालयाने तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
मनरेगा पुढाऱ्यांचे कुरण
जिंतूर तालुक्यातील मनरेगा पुढाऱ्यांसाठी आयते कुरण सापडले आहे. या योजनेच्या माध्यमातून बोगस हजेरीमस्टर, बोगस कामे व अधिकाऱ्याला हाताशी धरुन बोगस मोजमापपुस्तके करुन लाखोंचा गंडा शासनाला घालण्याचे काम जिंतूर तालुक्यात अनेक राजकीय पुढारी व कार्यकर्त्यांकडून होत आहे. या कामावर जिल्हा प्रशासनाला अंकुश लावलेला नाही.

Web Title: The government chose millions by using fake jobcards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.