पर्यायी स्त्रोत मिळाले
By Admin | Updated: September 6, 2014 00:28 IST2014-09-06T00:22:50+5:302014-09-06T00:28:20+5:30
नांदेड : शहर व परिसराची भिस्त विष्णूपुरी जलाशयावरच अवलंबून आहे़ त्यामुळे टंचाईच्या काळात पाण्याचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध होण्यासाठी मनपाने महत्वाकांक्षी योजना शासनाकडे सादर केली होती़

पर्यायी स्त्रोत मिळाले
नांदेड : शहर व परिसराची भिस्त विष्णूपुरी जलाशयावरच अवलंबून आहे़ त्यामुळे टंचाईच्या काळात पाण्याचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध होण्यासाठी मनपाने महत्वाकांक्षी योजना शासनाकडे सादर केली होती़ त्यानुसार, पैनंगगा नदीवरील इसापूर धरणाचे पाणी कॅनालद्वारे नंतर नाल्याद्वारे काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यात येणार आहे़ या योजनेसाठी १४़८७ कोटींच्या निधीलाही मंजुरी मिळाली आहे़
शहराची पाणीपुरवठा योजना गोदावरीवर अवलंबून आहे़ मागील दहा वर्षांत जेव्हा-जेव्हा गोदावरीच्या खोऱ्यात अल्पवृष्टी झाली तेव्हा-तेव्हा शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला़ या काळात जायकवाडी, सिद्धेश्वर व येलदरी या तीन धरणातून पाणी घेण्यात येत होते़ यंदा मात्र या तीनही धरणांत अत्यंत अल्प पाणीसाठा असल्यामुळे पाणी मिळण्याची शक्यता कमी झालेली होती़ त्यात विष्णूपुरीमध्येही केवळ ८ दलघमी पाणी राहिले होते़ त्यामुळे शहरावर पाणीटंचाईचे संकट घोंघावत होते़
या सर्व बाबी लक्षात घेवून २०१५ मधील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता मनपाने शहरासाठी खात्रीशिर पर्यायी स्त्रोत निर्माण होण्याच्या दृष्टीने योजना तयार केली होती़ त्यानुसार, इसापूर धरणाचे पाणी कॅनालद्वारे अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथपर्यंत आणण्यात येईल़ त्यापुढे मेंढला नाल्याद्वारे महादेव पिंपळगाव व सांगवी बंधाऱ्यात घेवून सांगवी येथे आसना नदीवर विहिरीचे बांधकाम करुन पम्पींगद्वारे काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यात येणाऱ या योजनेसाठी १४़८७ कोटी रुपयांना शासनाने २६ आॅगस्ट रोजी मान्यता दिली असून येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे़ त्यानंतर गोदावरी नदी व पैनगंगा नदीवरील विष्णूपुरी व इसापूर धरण हे दोन स्त्रोत कायमचे उपलब्ध होणार असल्यामुळे शहराला यापुढे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही़
या योजनेसाठी माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण, पालकमंत्री डी़ पी़ सावंत, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी धीरजकुमार, महापौर अब्दुल सत्तार, आयुक्त डॉ़ निशिकांत देशपांडे यांनी प्रयत्न केले़ (प्रतिनिधी)
विष्णूपुरी बंधाऱ्याने तळ गाठल्यावर शहरात पाणी कपात करण्यात येते़ वेळप्रसंगी सिद्धेश्वर, येलदरी येथून पाणी आणावे लागते, परंतु आता पैनगंगेवरील इसापूर धरणातूनही पाणी उपलब्ध होणार आहे़