आमदार निधी खर्चण्यात गोरेगावकरांची आघाडी

By Admin | Updated: July 26, 2014 00:42 IST2014-07-25T23:50:07+5:302014-07-26T00:42:38+5:30

हिंगोली : आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३ आमदारांमध्ये निधी खर्च करण्यात चालू वर्षी हिंगोलीचे आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे.

Goregaonkar's lead to spend MLA funds | आमदार निधी खर्चण्यात गोरेगावकरांची आघाडी

आमदार निधी खर्चण्यात गोरेगावकरांची आघाडी

हिंगोली : आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३ आमदारांमध्ये निधी खर्च करण्यात चालू वर्षी हिंगोलीचे आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक आमदाराला राज्य शासनाकडून दरवर्षी २ कोटी रुपयांचा निधी दिला जातो. या निधीतून सिमेंट रस्ते, सामाजिक सभागृह, शाळांना संगणक देणे, सार्वजनिक वाचनालय, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, लघू पाटबंधारेची कामे, पाणी पुरवठ्याची कामे, व्यायामशाळा, स्मशानभूमीची कामे, शाळा खोली विशेष दुरूस्ती, एस.टी.बसचे थांबे, प्रकल्प बाधीत गावठाणातील दुरूस्तीची कामे आदी कामे केली जातात. २०१३-१४ या आर्थिक वर्षांत आमदारांकडून सुचविण्यात आलेल्या कामांना दीडपटीने मंजूरी देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी प्रत्येकी ३ कोटी रुपयांची कामे सुचविली. मार्च २०१४ पूर्वी ही कामे पूर्ण करण्यात आली. गतवर्षीच्या २ कोटीनंतरची चालूवर्षाच्या निधीमधून हिंगोलीचे आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी ६५ लाख ३० हजार रुपयांची कामे केली. तर कळमनुरीचे तत्कालीन आ. राजीव सातव यांनी ४१ लाख ८५ हजार रुपयांची आणि वसमतचे आ. जयप्रकाश दांडेगावकर यांनी ६३ लाख ३१ हजार रुपयांची कामे केली. त्यानंतर आता एप्रिल २०१४ पासून करावयाच्या कामांच्या शिफारशी करणे व त्याची प्रशासकीय मंजूरी मिळणे, या प्रक्रियेत हिंगोलीचे आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांनीच आघाडी घेतली आहे. आ. गोरेगावकर यांनी चालू वर्षीच्या निधीतून आतापर्यंत १ कोटी ३० लाख रुपयांची २६ कामे प्रस्तावित केली. त्यापैकी ७४ लाख रुपयांची १५ कामे प्रशासकीय मंजूरीच्या अखेरच्या टप्प्यात आली आहेत. वसमतचे आ. जयप्रकाश दांडेगावकर यांनीही अनेक कामांसाठीची शिफारसपत्रे दिली आहेत; परंतु त्यांचे अंतिमीकरण झालेले नाही. परिणामी प्रशासकीय मान्यतेचा प्रश्नच नाही. कळमनुरीचे आ. राजीव सातव यांची लोकसभेवर निवड झाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा १६ मे नंतर दिला. त्यामुळे कळमनुरी विधानसभेसाठीचा निधी शिल्लक आहे. अन्यथा आ.सातव यांनीही विकास कामांसाठीच्या निधी खर्चात आघाडी घेतली असती. (जिल्हा प्रतिनिधी)
दोन कोटींचा निधी उपलब्ध
सद्यस्थितीत आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा नियोजन विभागाकडे २ कोटी रुपयांचा निधी बीडीएसवर उपलब्ध झाला आहे. जसेजसे कामांना प्रशासकीय कामांना मंजूरी मिळेल, तसे-तसे निधी उपलब्धतेचे प्रमाणही वाढत असल्याचे सुत्रांनी सांगितले. प्रशासकीय धोरणानुसार एका आमदाराला प्रत्येक महिन्याला १६ लाख ६६ हजार रुपयांचा विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो, हे विशेष होय.
सिमेंट रस्त्यांचीच कामे अधिक
जिल्ह्यातील आमदारांनी शिफारस केलेल्या कामांमध्ये सर्वाधिक कामेही सिमेंट रस्त्याचीच असल्याचे दिसून आले. विशेषत: आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांचीच बहुतेक कामे याबाबतची आहेत. याशिवाय समाज मंदिर, पाणी पुरवठा आदींसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
गतवर्षी दीडपटीने कामांना मंजुरी
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक आमदाराला दरवर्षी शासनाकडून देण्यात येतो दोन कोटी रुपयांचा निधी.
प्रत्येक महिन्याला प्रत्येक आमदाराला विकास कामांसाठी १६ लाख ६६ हजार रुपयांचा दिला जातो निधी.
२०१४-१५ या वर्षात आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी सुचविली १ कोटी ३० लाख रुपयांचा २६ कामे.
सुचविलेल्या २६ कामांपैकी ७४ लाख रुपयांची १५ कामे प्रशासकीय मंजुरीच्या अखेरच्या टप्प्यात.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी जवळपास २५ ते ३० दिवसांचाच कालावधी राहिल्याने आमदार निधीतून करण्यात येणाऱ्या कामांसाठी शिफारस पत्र देण्याची लगबग सुरू.

Web Title: Goregaonkar's lead to spend MLA funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.