\खायला शेण अन् पिण्यासाठी गोमूत्र
By Admin | Updated: December 1, 2015 00:30 IST2015-12-01T00:29:03+5:302015-12-01T00:30:38+5:30
औरंगाबाद : मनुष्य संशय अन् हव्यासापोटी अमानुषतेचा किती कळस गाठू शकतो, याची प्रचीती सोमवारी औरंगाबादेतील मिसारवाडीत आली.

\खायला शेण अन् पिण्यासाठी गोमूत्र
औरंगाबाद : मनुष्य संशय अन् हव्यासापोटी अमानुषतेचा किती कळस गाठू शकतो, याची प्रचीती सोमवारी औरंगाबादेतील मिसारवाडीत आली. लग्नानंतर सासरी पाय ठेवताच सासरच्यांनी नववधूला चक्क डांबून ठेवले. दिवसरात्र घरकामासाठी जनावरासारखे राबवून घ्यायचे अन् काम संपताच बाथरूममध्ये डांबायचे... धक्कादायक म्हणजे जेवणात खाण्यासाठी तिला चक्क गाईचे शेण अन् पिण्यासाठी पाण्याऐवजी गोमूत्र द्यायचे... गेल्या सहा महिन्यांपासून या नवविवाहितेवर हा अमानुष अत्याचार सुरू होता. अखेर सोमवारी शेजाऱ्यांनी सिडको पोलिसांच्या मदतीने या विवाहितेची सुटका केली.
सारिका वैजिनाथ जाधव (१९, रा. सध्या साईनगर, मिसारवाडी) असे या पीडित तरुणीचे नाव आहे. अन्नपाण्याविना सारिकाची प्रकृती अत्यंत नाजूक बनलेली असून, सुटका करताच पोलिसांनी तिला उपचारासाठी घाटीत दाखल केले.
घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मूळ परभणी येथील रहिवासी असलेल्या सारिकाचे वडील ती लहान असतानाच मरण पावलेले आहेत. औरंगाबादेतील म्हाडा कॉलनीत सारिकाची मावशी सुवर्णा शिवाजी वंजारे राहते. मावशीने सारिकासाठी संजय अग्रवाल (२६, रा. साईनगर, मिसारवाडी) याचे स्थळ आणले, पसंती झाली. सहा महिन्यांपूर्वी संजय आणि सारिकाचा विवाह झाला. सुखी संसाराचे स्वप्न उराशी बाळगून सारिका सासरी दाखल झाली. येथे पाय ठेवताच तिचे सर्व स्वप्न धुळीस मिळाले.
दरम्यान, सारिकाला सिडको ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी तिला मेडिकल मेमो देऊन तिच्या मावशीसोबत घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. वास्तविक पाहता, अशा गंभीर घटनेतील विवाहितेला घाटीत उपचारासाठी पोलिसांनी स्वत: घेऊन जाणे आवश्यक होते. दरम्यान याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. विवाहिता सारिका हिची तिच्या घरातून पोलिसांनी सुटका केल्याचे कळताच मी घटनास्थळी धाव घेतली. तिला घरात डांबून ठेवणाऱ्या तिच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सारिकाचा जबाब नोंदवून घेण्यासाठी आमचे एक पथक घाटीत गेलेले आहे, असे सिडको विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुखदेव चौघुले यांनी सांगितले.
माहिती मिळताच पोलीस पथकाने मिसारवाडीत जाऊन सारिकाची सुटका केली आहे. तिची प्रकृती खालावलेली असल्याने उपचारासाठी तिला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिचा जबाब घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, सध्या तपास सुरू आहे. नेमका प्रकार सारिकाच्या जबाबानंतरच स्पष्ट होईल. - राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त