खुशखबर ! घाटी रुग्णालयात मिळेल ‘टेस्ट ट्यूब बेबी’ने मातृत्व; महागडे उपचार मोफत

By संतोष हिरेमठ | Published: February 12, 2024 12:05 PM2024-02-12T12:05:20+5:302024-02-12T12:06:23+5:30

७.२० कोटींच्या यंत्रसामुग्रीला मंजुरी, आयव्हीएफ सेंटर होणार

Good news! 'Test tube baby' will get motherhood at Ghati Hospital Chhatrapati Sambhajiangar; Expensive treatment for free | खुशखबर ! घाटी रुग्णालयात मिळेल ‘टेस्ट ट्यूब बेबी’ने मातृत्व; महागडे उपचार मोफत

खुशखबर ! घाटी रुग्णालयात मिळेल ‘टेस्ट ट्यूब बेबी’ने मातृत्व; महागडे उपचार मोफत

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरणाऱ्या घाटी रुग्णालयात लवकरच वंध्यत्वग्रस्तांना ‘टेस्ट ट्यूब बेबी’ तंत्रज्ञानाने मातृत्वाचा आनंद घेता येणार आहे. याठिकाणी ७.२० कोटी रुपयांच्या यंत्रसामग्रीतून आयव्हीएफ सेंटर साकारण्यात येणार आहे. वंध्यत्व निवारणाचे महागडे उपचार घाटीत मोफत होतील.

राज्यातील ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये राज्य योजनेत उपलब्ध होणाऱ्या अनुदानातून आयव्हीएफ सेंटर स्थापित करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करण्यास शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. यात छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचाही (घाटी) समावेश आहे. घाटीतील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या अंतर्गत हे आयव्हीएफ सेंटर साकारले जाईल. यासाठी घाटीतील सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलमधील जागेची चाचपणी केली जात असल्याचे समजते. अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंटर कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

खाजगीत किती खर्च?
खाजगी रुग्णालयातील आयव्हीएफ सेंटरमध्ये टेस्ट ट्यूब बेबीचे उपचार घेण्यासाठी किमान ८० हजार ते दीड लाखांपर्यंतचा खर्च येतो. घाटीत हा उपचार मोफत होईल. वंध्यत्वाला सामोरे जाणाऱ्या गोरगरीब जोडप्यांना त्याचा मोठा आधार मिळेल. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले, चार ते पाच महिन्यांत हे सेंटर सुरू होईल. त्यासाठी प्रारंभी १०० किट मिळणार आहेत.

काय आहे आयव्हीएफ ?
महिलेच्या गर्भाशयातील स्त्रीबीज व पुरुषाच्या वीर्योत्पादक ग्रंथींमधून शुक्राणू काढला जातो. लॅबमध्ये स्त्रीबीजांडात शुक्राणू सोडला जातो व संयोग घडवून आणला जातो. प्रयोगशाळेत गर्भधारणा झाल्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी स्त्रीच्या गर्भात ते सोडले जाते.

Web Title: Good news! 'Test tube baby' will get motherhood at Ghati Hospital Chhatrapati Sambhajiangar; Expensive treatment for free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.