पदोन्नतीमध्ये वशिल्यांना अच्छे दिन!
By Admin | Updated: June 27, 2014 01:02 IST2014-06-27T01:02:06+5:302014-06-27T01:02:50+5:30
औरंगाबाद : महापालिकेत अनुकंपा धर्तीवर दोन महिन्यांपूर्वी भरती झालेल्यांना थेट पदोन्नती मिळाली आहे.

पदोन्नतीमध्ये वशिल्यांना अच्छे दिन!
औरंगाबाद : महापालिकेत अनुकंपा धर्तीवर दोन महिन्यांपूर्वी भरती झालेल्यांना थेट पदोन्नती मिळाली आहे. मनपात वशिलेवाल्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरी पाणी भरीत आहेत, त्यांच्या गुणवत्तेचा, अनुभवाचा विचार न करता त्यांना लिपिक होण्याची संधी मिळाली आहे, तर जे पदवीधर आहेत त्यांना माळी काम देण्यात आले आहे. आस्थापना विभागातील लाग्याबांध्यांचा हा गैरव्यवहार चव्हाट्यावर आल्यामुळे आता कुणाचे ‘बुरे दिन’ सुरू होणार हे सांगता येत नाही. या प्रकरणी हाती आलेली माहिती अशी, ४ मार्च २०१४ रोजी अनुकंपा समितीची बैठक झाली. बैठकीला उपायुक्त सुरेश पेडगावकर, विधि सल्लागार ओ.सी. शिरसाठ, उपायुक्त रवींद्र निकम यांची उपस्थिती होती.
३४ कर्मचाऱ्यांपैकी १६ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचे ठरले.
पदोन्नती यादी व अहवालात १ ते १७ पर्यंत कर्मचाऱ्यांची नावे होती. त्यातील १६ जणांना पदोन्नती देण्याचे ठरले.
नगरसेवक म्हणाले
नगरसेवक समीर राजूरकर म्हणाले, जर पदोन्नतीची प्रक्रिया बेकायदेशीर होत असेल, तर ती तातडीने थांबविली पाहिजे. पदोन्नतीमध्ये कुणावरही अन्याय होऊ नये.
असा आहे यादीतील घोळ
मनपातील एका शासननियुक्त अधिकाऱ्याची हुजरेगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाला शिपाईपदी पदोन्नती हवी होती. त्याला क्लार्क करण्यात आले आहे, तर यादीमध्ये एका कर्मचाऱ्याच्या पत्नीला भरती, पदोन्नती दिल्याचे नमूद करण्यात आले असून त्या ठिकाणी पुरुषाचे नाव आहे.
एक कर्मचाऱ्याचे शिक्षण बी.एस्सी. मराठी असे दाखविले आहे, तर पदवीधर कर्मचाऱ्याला माळी आणि दहावी पास कर्मचाऱ्याला क्लार्क करण्यात आले आहे.
भरतीवर आक्षेप
उपायुक्त सुरेश पेडगावकर यांची २६ एप्रिल रोजी बदली झालेली आहे. त्यांना अजून कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. त्यांना मुदतवाढ मिळावी, याचा अर्जही शासनाने फेटाळला. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील भरती व पदोन्नतीवर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.
उपमहापौरांचे पत्र
उपमहापौर संजय जोशी यांनी या प्रकरणी आजच आयुक्तांना पत्र देऊन पदोन्नती प्रक्रियेची माहिती मागविली आहे. अनुभवी आणि उच्च शिक्षितांना डावलून पदोन्नत्या दिल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी सर्वसाधारण सभेत निर्णय घेऊच, तेथे न्याय न मिळाल्यास पोलीस आणि कोर्टात धाव घेण्याचा इशारा त्यांनी दिला.
उपायुक्त म्हणाले...
दोन महिन्यांपूर्वी अनुकंपा धर्तीवर भरती झाली. त्यातील २१ जणांना पदोन्नती दिली आहे. चार जागा अद्याप रिक्त आहेत. जर कुणाला असे वाटत असेल आपल्यावर अन्याय झाला आहे, तर त्याने प्रशासनाकडे अर्ज करावा. माहिती अधिकारामध्ये देखील कुणी माहिती मागविली तरी जे सत्य आहे, ते समोर येईल. त्यामुळे अन्याय होईल असा निर्णय घेतलेला नाही, असा दावा उपायुक्त सुरेश पेडगावकर यांनी लोकमतशी बोलताना केला.