पशूसंवर्धनच्या जागेवरुन जिल्हा परिषदेत गदारोळ
By Admin | Updated: August 26, 2014 23:55 IST2014-08-26T23:31:56+5:302014-08-26T23:55:21+5:30
परभणी: जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार गदारोळ झाला.

पशूसंवर्धनच्या जागेवरुन जिल्हा परिषदेत गदारोळ
परभणी: जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जिंतूर येथील पशूसंवर्धन विभागाच्या जागेवर बीओटी तत्वावर पंचायत समितीची इमारत व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान उभारण्याच्या कारणावरुन जोरदार गदारोळ झाला.
जिल्हा परिषदेची मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अध्यक्षा मीनाताई बुधवंत यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा सुरु झाली. या सर्व साधारण सभेत सर्वाधिक चर्चा ही जिंतूर येथील पशूसंवर्धन विभागाच्या जागेवरुनच झाली. सदरील जागेवर जिल्हा परिषदेच्या वतीने पंचायत समितीची इमारत व कर्मचारी वसाहतीचे बांधकाम करण्यासाठी सर्व्हे नं.१४६ मध्ये बीओटी तत्वावर बांधकाम करण्यासाठी निविदा काढण्यास मंजुरी देण्यासंबंधी ठरावावर चर्चा झाली. सत्ताधाऱ्यांनी हा ठराव मंजूर करुन घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न चालविले. त्याला काँग्रेसच्या सदस्यांनी विरोध दर्शविला. या प्रकरणी राष्ट्रवादीकडून लक्ष्मण मुंडे, रामेश्वर जावळे, दादासाहेब टेंगसे, जगन्नाथ जाधव यांनी तर काँग्रेसकडून मेघना बोर्डीकर, आत्माराम पवार यांनी बाजू मांडली. याच विषयावरुन या सर्वसाधारण सभेत जोरदार गदारोळ झाला. याच दरम्यान, राज्याच्या कृषी, पशूसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभागाचे अव्वर सचिव प्रा.प्र.वसईकर यांच्या स्वाक्षरीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे मुंबईहून पत्र पाठविण्यात आले. त्यामध्ये आ.रामप्रसाद बोर्डीकर यांनी २५ आॅगस्ट रोजी दिलेल्या पत्राचा संदर्भ देऊन सर्व्हे नं.१४६ मधील जागेच्या सात-बारा उताऱ्यावर सदर जागा जनावरांच्या दवाखान्यासाठी आहे. या प्रकरणी या प्रस्तावाची छाननी करण्यासंदर्भात तसेच कार्यवाहीस स्थगिती देण्याचे आदेश पशूसंवर्धन मंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही करुन याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्यात यावा, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास सुरु झालेली सर्वसाधारण सभा सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास संपली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये याच विषयावर प्रमुख सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या वादावादीत अधिकारीही चांगलेच संतापल्याचे दिसून आले. रात्री ८ वाजेपर्यंत या विषयावर चर्चा सुरुच होती. (प्रतिनिधी)
जि.प.ची शेवटची सर्वसाधारण सभा ?
सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कालावधी सप्टेंबरमध्ये संपत आहे. त्यानंतर पुढील अडीच वर्षासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. याच दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने मंगळवारी झालेली सर्वसाधारण सभा ही विद्यमान पदाधिकाऱ्यांची शेवटची सर्वसाधारण सभा होती़ त्यामुळे विविध प्रस्ताव मंजूर करुन घेण्याची घाई या सर्वसाधारण सभेतून झाली असल्याचेही समजले.