बिनविरोध निवडणुकीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

By Admin | Updated: April 13, 2015 00:48 IST2015-04-13T00:39:02+5:302015-04-13T00:48:10+5:30

एस़आऱमुळे , शिरूर अनंतपाळ तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचे हे ‘सुवर्ण महोत्सवी’ वर्ष आहे़ गावातील मारुती मंदिराच्या पारावर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येऊन निवड करण्यात येते़

Golden Jubilee Year of uncontested election | बिनविरोध निवडणुकीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

बिनविरोध निवडणुकीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष


एस़आऱमुळे , शिरूर अनंतपाळ
तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचे हे ‘सुवर्ण महोत्सवी’ वर्ष आहे़ गावातील मारुती मंदिराच्या पारावर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येऊन निवड करण्यात येते़
गावात ग्रामपंचायतची निवडणूक झाली तर हेवेदावे वाढतात आणि विकास कामात अडथळे निर्माण होतात हे तालुक्यातील धामणगावच्या ग्रामस्थांनी ओळखून जवळपास १९६५ पासून ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याची परंपरा जपली आहे़ २०१५ हे साल बिनविरोध निवडणुकीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे़ शुक्रवारी केवळ आठ सदस्यांनी आपले नामांकनपत्र ठेवून उर्वरित इच्छुकांनी आपले नामांकनपत्र मागे घेतले आहे़ त्यामुळे धामनगाव ग्रामपंचायत बिनविरोध निघाली आहे़ राजकीय पक्ष आणि विविध पक्षांत विभागलेल्या गावांसाठी हा मोठा आदर्श निर्माण झाला आहे़
धामनगावातील मारुती मंदिरावर निवड समितीचे ज्येष्ठ नागरिक एकत्र येतात़ ते निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची मुलाखत घेतात व ज्येष्ठ नागरिकांची नावे घोषित करतात. निवड समितीचा व ज्येष्ठ नागरिकांचा सर्वजण सन्मान ठेवून उमेदवारांना मान्यता देतात. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीची पन्नास वर्षांची परंपरा लाभली आहे.
बिनविरोध निवडीचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने या नूतन सदस्यांनी ग्रामस्थांसमोर भ्रष्टाचार करणार नाही, एक गाव- एक पाणवठा, एक स्मशानभूमी त्याचबरोबर मागील वर्षी ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात दुसरा क्रमांक मिळाला. आता पहिला क्रमांक मिळवू, असा संकल्प धनंजय पाटील, मनीषा महामुनी, ज्ञानोबा बोळंगे, सुनीता कोरे, सुनील जाधव, शिवनंदा कदम, कमलाकर सूर्यवंशी, लुब्जाबाई कोरे यांनी केला आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य विजयकुमार पाटील, मोहन भोसले, पांडुरंग जाधव, शिवाजी भोसले, सूर्यकांत खंडागळे, विश्वनाथ रोडगे, ज्ञानोबा माने यांची उपस्थिती होती़

Web Title: Golden Jubilee Year of uncontested election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.