दसऱ्याच्या मुहूर्तावर चोरट्यांनी लुटले असेही ‘सोने’

By Admin | Updated: October 13, 2016 01:07 IST2016-10-13T00:40:56+5:302016-10-13T01:07:59+5:30

औरंगाबाद : दसऱ्याच्या दिवशी एकीकडे नागरिक सोने लुटत होते, तर दुसरीकडे गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या मोबाईलची लूट केली

'Gold' has been robbed by the thieves of Dusa | दसऱ्याच्या मुहूर्तावर चोरट्यांनी लुटले असेही ‘सोने’

दसऱ्याच्या मुहूर्तावर चोरट्यांनी लुटले असेही ‘सोने’


औरंगाबाद : दसऱ्याच्या दिवशी एकीकडे नागरिक सोने लुटत होते, तर दुसरीकडे गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या मोबाईलची लूट केली. मुकुंदवाडी, गजानन मंदिर परिसरातून एकाच चोरट्याने तब्बल १८ जणांचे मोबाईल पळविले.
एन-२ सिडको, राजीव गांधीनगर येथील संतोष सोनवणे मंगळवारी सकाळी मित्रासह झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मुकुंदवाडी येथील मार्केटमध्ये गेले होते. यावेळी सोनवणे आणि त्यांच्या मित्राच्या खिशातील दोन मोबाईल चोरट्यांनी पळविले. एवढेच नव्हे तर अन्य दोन जणांचे हॅण्डसेटही चोरट्यांनी यावेळी चोरून नेले. ही घटना घडल्यानंतर तासाभराने कृष्णा पांडुरंग भानुसे (रा. एस. टी. कॉलनी, मुकुंदवाडी) हे मुकुंदवाडी येथील बाजारात फुले खरेदीकरिता गेले होते. त्यांनी फुले खरेदी केली. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या आणि मित्राच्या खिशातील एकूण ४५ हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे तीन हॅण्डसेट चोरून नेले. गारखेडा परिसरातील कृतार्थ अपार्टमेंट येथील रहिवासी वसंत मसाळ मंगळवारी सकाळी गजानन महाराज मंदिरासमोरील एका दुकानावर फुले खरेदीसाठी गेले होते.
यावेळी चोरट्यांनी त्यांच्या खिशातील २२ हजारांचा मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तरानगरीतील वसंत शिंपी हे मंगळवारी दुपारी १२ वाजता मुकुंदवाडी येथे फुले खरेदी करण्यासाठी गेले. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या आणि मित्राच्या शर्टच्या वरच्या खिशातील दोन वेगवेगळे मोबाईल हॅण्डसेट चोरून नेले. या दोन्ही मोबाईलची किंमत ४७ हजार रुपये आहे.
क्रांतीचौक परिसरातील दांडिया पाहण्यासाठी गेलेल्या एका मुलीच्या हातातील पाच हजारांचा मोबाईल चोरट्यांनी लांबविला. ही घटना सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुलीच्या आईने क्रांतीचौक ठाण्यात तक्रार दिली. टी.व्ही. सेंटर येथील फूल मार्केटमध्ये फुले खरेदीसाठी स्वप्नील बोडखे आणि प्रवीण हरकल गेले होते. फुले खरेदी करण्यात ते व्यग्र असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या खिशातील २५ हजारांचे मोबाईल लांबविले. अन्य एका घटनेत शुभम घुले या तरुणाचा मोबाईल रामलीला मैदानावर चोरीला गेला.
गुन्हे नोंदविताना चलाखी
विशेष म्हणजे गुन्हे नोंदवितानाही पोलिसांनी गुन्ह्यांची संख्या वाढू नये, याची काळजी घेतली. प्रत्येक तक्रारदाराचे स्वतंत्र गुन्हे दाखल न करता पोलिसांनी एकाच तक्रारीमध्ये अन्य लोकांचेही मोबाईल चोरीला गेल्याचे नमूद केले.
एवढेच नव्हे तर एकाची तक्रार नोंदविताना मित्राचाही मोबाईल चोरी गेल्याचे यात नमूद केले. विशेष म्हणजे दोन्ही तक्रारदार एकमेकांच्या परिचयाचे नसतानाही पोलिसांनी त्यांना मित्र ठरविले.

Web Title: 'Gold' has been robbed by the thieves of Dusa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.