सोने खरेदीदार आयकरच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:51 IST2017-10-28T00:51:43+5:302017-10-28T00:51:51+5:30
मागील दोन वर्षांत ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे सोने खरेदी करणा-या ग्राहकांची यादी शहरातील ज्वेलर्सने आयकर विभागाकडे सपूर्द करणे सुरू केले आहे

सोने खरेदीदार आयकरच्या रडारवर
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मागील दोन वर्षांत ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे सोने खरेदी करणा-या ग्राहकांची यादी शहरातील ज्वेलर्सने आयकर विभागाकडे सपूर्द करणे सुरू केले आहे. मागील १५ दिवसांत २५ पेक्षा अधिक ज्वेलर्सने त्यांच्याकडील ग्राहकांची नावे व बिले विभागाला दिली आहेत. दिवाळीनंतर उर्वरित ज्वेलर्स यादी करण्याच्या कामात लागले आहेत. यामुळे २ लाखांपर्यंत नगदीमध्ये सोने खरेदी करणारे व त्यापेक्षा अधिक रकमेचे धनादेशद्वारे सोने खरेदी करणारे आयकर विभागाच्या रडारवर येत आहेत.
आॅगस्ट महिन्यात आयकर विभागाने शहरातील २५० पेक्षा अधिक लहान-मोठ्या ज्वेलर्सला पत्रे पाठविली होती. यात आयकर कायदा १९६१ च्या १३३ (६) या नियमानुसार ज्वेलर्सकडून माहिती मागविण्यात आली होती. ज्या ग्राहकांनी ५० हजार ते १ लाख ९९ हजार ९९९ रुपयांदरम्यान सोने, दागिने खरेदी केले. तसेच ज्यांनी २ लाखांपेक्षा अधिक रकमेचे सोने धनादेश देऊन खरेदी केले अशा ग्राहकांची यादी मागविण्यात आली होती. यात वर्षभरात दोन, तीन, चार टप्प्यांत जरी सोने खरेदी केले असेल व त्यांची रोख रक्कम ५० हजारांपेक्षा अधिक होत असेल अशा ग्राहकांची नावे ज्वेलर्सने द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मागील दोन वर्षांतील खरेदीदारांची यादी देणे ज्वेलर्सला बंधनकारक होते. २५ पेक्षा अधिक ज्वेलर्सने त्यांच्याकडील ग्राहकांची यादी आणून दिली आहे.
आता सोने खरेदी करणारे आयकर विभागाच्या रडारवर येत आहेत. यातून आयकर न भरणारे ग्राहकांना शोधून त्यांना आयकर भरण्यासाठी नोटीस पाठविण्यात येणार आहे.