रिपाइं भाजपासोबत जाणार
By Admin | Updated: December 23, 2016 00:12 IST2016-12-23T00:10:54+5:302016-12-23T00:12:39+5:30
उस्मानाबाद : दोन दिवसांपूर्वीच जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडल्यानंतर गुरुवारी प्रदेश सचिव संजयकुमार बनसोडे यांनीही पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

रिपाइं भाजपासोबत जाणार
उस्मानाबाद : दोन दिवसांपूर्वीच जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडल्यानंतर गुरुवारी प्रदेश सचिव संजयकुमार बनसोडे यांनीही पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामुळे रिपाइंतील (आठवले गट) अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, होवू घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्ष भाजपसोबत जाणार असल्याचे गुरुवारी झालेल्या बैठकीत बनसोडे यांनी स्पष्ट केले.
जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांपूर्वी रिपाइंची उस्मानाबादेत बैठक झाली होती. या बैठकीत आगामी निवडणुकीत पक्ष महायुतीसोबत जाईल आणि महायुती होत नसेल तर पक्षासमोर सर्व पर्याय खुले असतील असे ओहाळ यांनी म्हटले होते. या बैठकीतच त्यांनी पालिका निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात तसेच काही पदाधिकाऱ्यांनी अन्य पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढविल्यामुळे त्यांची हकालपट्टी केल्याची घोषणा केली होती. दरम्यान, गुरुवारी राज्य सचिव संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत झालेल्या तातडीच्या बैठकीत आगामी निवडणुकीत भाजपासोबत युती करण्याचे निश्चित करण्यात आले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व राखीव जागा पक्षाला सोडल्यास रिपाइं भाजपसोबत युती करेल असे बनसोडे यांनी सांगितले. युतीसंदर्भात आ. सुजितसिंह ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पक्षाची जिल्ह्यात मोठी ताकद असून, भाजपासोबत राहिल्यास भाजपाबरोबरच रिपाइंलाही याचा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, रिपाइंची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याचे सांगत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या आदेशानुसार लवकरच नवी कार्यकारिणी निवडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.