देवकुरळीत दोन घरे फोडली
By Admin | Updated: April 14, 2016 01:01 IST2016-04-14T00:56:18+5:302016-04-14T01:01:50+5:30
तामलवाडी : कुलूपबंद घराचा कडी कोयंडा कटावणीच्या सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करुन दोन घरफोड्या केल्या व रोख ८०

देवकुरळीत दोन घरे फोडली
तामलवाडी : कुलूपबंद घराचा कडी कोयंडा कटावणीच्या सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करुन दोन घरफोड्या केल्या व रोख ८० हजारासह १ लाख ५६ हजाराचा ऐवज चोरून नेल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील देवकुरूळी येथे बुधवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. चोरीच्या प्रकारामुळे गावकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
देवकुरूळी येथील ज्योतीबा मंदिराजवळ शिवाजी नवगिरे यांचे घर असून चोरट्यांनी भिंतीवरून घरात प्रवेश मिळविला. आतील खोल्यांचे कुलुप तोडून लोखंडी कपाटातील ड्रॉक्टर मधील सोन्याचे दागिने साड्या घेऊन पोबारा केला. त्यावेळी घरातील मंडळी अंगणात झोपले होते. त्यांना या चोरीची कल्पनाही येऊ दिली नाही. या घरफोडीनंतर चोरट्यांनी आपला मोर्चा तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या शशिकांत महादेव नवगिरे यांच्या घराकडे वळविला. या कुलूप बंद घराला लावलेला कडी कोयंडा अलगदपणे काढून लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये व ड्रॉवरमध्ये ठेवलेले रोख ८० हजार व दीड तोळे सोने असा एकूण १ लाख ५ हजाराचा ऐवज मुद्देमाल चोरून नेला. सदरील चोरीची घटना बुधवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांत खळबळ उडाली. शिवाजी मारुती नवगिरे रा. देवकुरूळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गावकरी ठाण्यात
गावातील चोरीच्या घटनेची माहिती घेऊन पोलीस ठाण्याला कळविण्यासाठी माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव, उपसरपंच भिवाजी गवळी, कुमार नवगिरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हणमंत गवळी, शिवाजी नवगिरे, शशीकांत नवगिरे हे सकाळी दाखल झाले. माहिती कळताच पोउपनि सुरेश शिंदे, जयराम राठोड यांनी घटना स्थळाला भेट देऊन चोरीची सत्यता पडताळली. दुपारी साडेबारा वाजता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
पोलिसांना आव्हान
सावरगाव वीज उपकेंद्रात अज्ञात चार चोरट्यांनी सोमवारी पहाटे ४ वाजता प्रवेश करून नागप्पा पुजारी या कर्मचाऱ्याला मारहाण करून चाकूचा धाक दाखवून १४ हजार ५०० रुपयाचा ऐवज चोरला. ही घटना ताजी असतानाच पुन्हा चोरट्यांनी देवकुरूळी गावात धुडगुस घातला. चोरट्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. यावेळी देवकुरुळीत पोलीस गस्त वाढविण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली. (वार्ताहर)