गोदामाच्या आगीचे गूढ कायम

By Admin | Updated: December 4, 2014 00:52 IST2014-12-04T00:27:27+5:302014-12-04T00:52:19+5:30

जालना : येथील पंचायत समितीच्या गोदामास गेल्या वर्षापूर्वी लागलेल्या भीषण आगीच्या चौकशीसंदर्भात शासकीय पातळीवर अद्यापही कागदोपत्री घोडे नाचविले जात आहेत.

The godown's fire remains intriguing | गोदामाच्या आगीचे गूढ कायम

गोदामाच्या आगीचे गूढ कायम


जालना : येथील पंचायत समितीच्या गोदामास गेल्या वर्षापूर्वी लागलेल्या भीषण आगीच्या चौकशीसंदर्भात शासकीय पातळीवर अद्यापही कागदोपत्री घोडे नाचविले जात आहेत.
जुना जालना भागात पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात मोठे गोदाम आहे. त्या गोदामात कृषी व समाज कल्याण विभागांतर्गत विविध योजनेतील लाभार्थ्यांसाठीचे साहित्य मोठ्या साठविण्यात आले होते. लाभार्थ्यांना ते साहित्य वितरित करण्याऐवजी अनेक महिन्यांपासून धूळखात पडून होते. विशेषत: रमाई घरकुल योजनेसाठी पहिल्याच वर्षी म्हणजेच २०११ -१२ या वर्षासाठी एस. सी अनुसूचित जातीतील नागरिकांसाठी हजारो ब्लँकेट, सतरंजी व सौर दिव्यांचे साहित्य वाटपासाठी आले होते. ३० मार्च २०१३ रोजी सायंकाळी गोदामाला लागलेल्या आगीत ते संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. परिणामी हजारो लाभार्थी साहित्यापासून वंचित राहिले. या आगीत कृषी विभागातर्फे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना, अल्पभूधारकांना वितरीत केल्या जाणारे कृषी औजारे व अन्य साहित्यही भस्म झाले.
या आगीत किमान ५० ते ६० लाख रुपयांचे साहित्य खाक झाल्याचा सकृतदर्शनी अंदाज व्यक्त करण्यात आला होता. ती आग संशयास्पद असल्याचाही सूर शासकीय वर्तूळातूनच व्यक्त करण्यात येत होता. त्या अनुषंगानेच चौकशी व्हावी, अशी मागणी काही लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. तेव्हा शासकीय स्तरावर त्या आगीसंदर्भात चौकशीसाठी हालचाली सुरु झाल्या. गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश बजावल्यानंतर त्या आगीमागील गुढ उघडकीस येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु सव्वा वर्ष उलटल्यानंतर सुध्दा त्या आगीमागील कारण, त्यात खाक झालेल्या वस्तू, त्याच्या किंमती, एकूण नुकसान तसेच गोदामकीपरची हजेरी, गैरहजरी, निष्काळजीपणा वगैरे गोष्टींबाबत स्पष्टता झाली नाही.
पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी या अनुषंगाने पंचनामा केला. पोलिस प्रशासनाने नोंद घेवून सकृतदर्शनी पंचनामा केला. परंतु त्यापुढे घोडे सरकले नाही.
वास्तविकता आग कोणत्या कारणामुळे लागली याची चौकशी करण्यासाठी समाजकल्याण आयुक्तांनी दोन वेळेस पंचायत समितीला पत्र पाठवले. याची शहानिशा करण्याच्या सुचना दिल्या. पंचायत समितीने पत्र प्राप्त झाल्यानंतर त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. परिणामी समाज कल्याण खात्यास पुन्हा पत्र पाठविण्याची वेळ आली आहे.
या प्रकरणाची चौकशी पुढे सरकत नसल्याने या आगीचे गुढ कायम आहे. शंका-कुशंका निर्माण होत आहेत. यापूर्वीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत जाणीवपूर्वक दाखविलेल्या उदासनीतेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. नव्या गटविकास अधिकाऱ्यांनी याची कसून चौकशी करावी, असा सूर आहे.(प्रतिनिधी)
रमाई घरकुल योजनेअंतर्गत जिल्हातील एस.सी प्रवार्गातील नागरीकांना ब्लॅकेट, सतरंजी, सौरदिवे वितरण करण्यात आले होते. त्यात जालना तालुक्यातील दोन हजार लाभार्थ्यासाठी आलेले साहित्य या गोदाताम धुळखात होते. या व्यतिरिक्त कृषी विभागाच्याही फवारणी पंप, पाईप ताडपत्र्या असे लाखो रूपयांच्या साहित्याचा समावेश होता.
पंचायत समितीच्या गोदामाला लागलेल्या आगीत सर्व साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक अहवालानुसार ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. परंतु त्या गोदामात विजेचे कनेक्शन किंवा तारा वगैरे गोष्टी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळेच ही आग कशामुळे लागली याचा आत्तापर्येत थांगपत्ता नाही. यामुळे याविषयी तर्क-वितर्क व्यक्त होत आहेत.
या साहित्य जळीत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समाजकल्याण आयुक्त यांनी दोन वेळेस पत्र पाठविले परंतु त्यांच्या पत्राला पंचायत समितीकडून कोणताच खुलासा देण्यात आला नाही. त्यामुळे आयुक्त कार्यालयाकडून पुन्हा पत्र पाठविण्यात आले आहे. त्यासाठी निर्लेखन अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचे बीडीओ सचिन सूर्येवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.

Web Title: The godown's fire remains intriguing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.