मराठवाड्यात ‘खादी’चे वैभव
By Admin | Updated: October 2, 2014 00:36 IST2014-10-02T00:26:10+5:302014-10-02T00:36:45+5:30
आशपाक पठाण , लातूर आधुनिक युगात देशभरात अनेक बदल झाले. कापड उद्योगातही नवनवीन व्हरायटीजही बाजारात आल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधीजींनी स्वदेशी चळवळ उभी करून खादीचे महत्व वाढविले.

मराठवाड्यात ‘खादी’चे वैभव
आशपाक पठाण , लातूर
आधुनिक युगात देशभरात अनेक बदल झाले. कापड उद्योगातही नवनवीन व्हरायटीजही बाजारात आल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधीजींनी स्वदेशी चळवळ उभी करून खादीचे महत्व वाढविले. खादीच्या कपड्याचा वापर हा चळवळीतील कार्यकर्ते व पुढाऱ्यांमध्ये अधिक होता. दिवस बदलले. तसे पुढाऱ्यांचे राहनीमानही बदलले. त्यामुळे खादीला वाईट दिवस येतील, अशी चर्चा होत असताना तरुणाईने खादीचा स्वीकार केला. ग्राहकांची पसंती वाढत गेल्याने खादीला पुन्हा वैभव प्राप्त झाले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी यांनी चरख्यावर सूत कताई सुरू केली. विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकीत ‘स्वदेशी वापरा’ असा नारा देत त्यांनी खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून रोजगाराची नवी वाट शोधून दिली. मराठवाडा हा हैदराबाद संस्थानमध्ये असताना लातूर शहरात खादी ग्रामोद्योगची मुहूर्तमेढ रोवली गेली. औसा, उदगीर या ठिकाणी जवळपास पाच-पाच एकर जागेमध्ये आजही सूत कताई करून खादीचे कपडे तयार केले जातात. शिवाय, बाजूच्या उस्मानाबाद जिल्ह्यातही भूम, परंडा, नांदेड जिल्ह्यातील कंधार, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आदी ठिकाणी खादी विणली जाते. याच ठिकाणी तयार झालेले खादीचे कपडे लातूर शहरातील हनुमान चौकात असलेल्या खादी ग्रामोद्योग भांडारात विक्रीसाठी ठेवण्यात येतात. दरवर्षी या ठिकाणी जवळपास ४५ ते ५० लाख रुपयांची उलाढाल होते. मधल्या काळात खादीकडे राजकीय पुढारी व नेत्यांनीही पाठ फिरविली होती. त्यामुळे खादी नामशेष होणार की काय, अशी अवस्था निर्माण झाली होती. मात्र खादीच्या कपड्यांची क्रेझ तरुणांमध्येही शिरली. परिणामी, खादीचे कपडे खरेदी करण्यासाठी त्यांचा कल अधिक वाढला.
सण, उत्सव, समारंभ आदी कार्यक्रमांतही खादीचे कपडे वापरले जाऊ लागले. आजही १५ आॅगस्ट, २६ जानेवारी, २ आॅक्टोबर गांधी जयंती, १७ सप्टेंबर आदी राष्ट्रीय उत्सवात खादीचे कपडे वापरले जातात. खादीला पूर्वीप्रमाणेच चांगले दिवस आहेत. मात्र काही ठिकाणी रोजगार वाढल्याने सूत कताईकडे मजूर पाठ फिरवित असल्याची अवस्था आहे.
मराठवाड्यातील उदगीर, औसा, कंधार, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आदी ठिकाणी खादीच्या कपड्याची निर्मिती होते. या उद्योगातून जवळपास तीन हजार लोकांना रोजगार मिळतो. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परंडा येथील खादीचा व्यवसाय दोन वर्षांपूर्वी बंद पडला आहे. हा अपवाद वगळता अन्य ठिकाणी अजूनही सूत कताईवर १०० टक्के खादीचा कपडा तयार केला जातो. लातूरच्या खादी ग्रामोद्योग केंद्रात खादीचे शर्ट, पँट, साड्या यासह विविध कपडे मिळतात. २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीला या केंद्रात जवळपास एक महिना ग्राहकांना खरेदीवर २० टक्क्यांची सूट दिली जात असल्याचे व्यवस्थापक शंकर रंगनाथ पाटील यांनी सांगितले.