कर्तृत्ववान महिलांचा गौरव प्रेरक : जिल्हाधिकारी
By Admin | Updated: October 18, 2016 00:10 IST2016-10-18T00:07:34+5:302016-10-18T00:10:31+5:30
लातूर : ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या आठ कर्तृत्ववान महिलांना ‘लोकमत सखी सन्मान पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.

कर्तृत्ववान महिलांचा गौरव प्रेरक : जिल्हाधिकारी
लातूर : ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या आठ कर्तृत्ववान महिलांना ‘लोकमत सखी सन्मान पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. यामध्ये डॉ. जोत्स्ना कुकडे यांना सेवा क्षेत्रासाठी जीवनगौरव पुरस्काराने, डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकरांना वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल, प्राचार्य कुसुमताई मोरे यांना शैक्षणिक योगदानाबद्दल, नृत्य शिक्षिका प्रा. नभा बडे यांना सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल, माया सोरटे यांना सामाजिक क्षेत्राबद्दल, उमादेवी जाधव यांना शौर्य गटासाठी तर आंतरराष्ट्रीय खेळाडू जागृती चंदनकेरे यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल सोमवारी दयानंद सभागृहात मान्यवरांच्या हस्ते ‘लोकमत सखी सन्मान पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
‘लोकमत’ने कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार देऊन केलेला हा गौरव प्रेरक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी या सोहळ्यानंतर बोलताना व्यक्त केले. यावेळी लातूर महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी जिल्हाधिकारी पोले आणि आयुक्त पवार यांच्यासह कार्यक्रमाचे प्रायोजक राजयोग इंडस्ट्रीचे प्रवीण ब्रिजवासी आणि दत्तात्रय पाटील, संगम हायटेक नर्सरीचे संगमेश्वर बोमणे, विष्णूभैय्या खोडवेकर प्रतिष्ठानचे मनोज डोंगरे यांच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालबाबूजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी लोकमत सखी मंच सदस्यांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)