जि.प.च्या सात शिक्षकांना पुरस्कार प्रदान
By Admin | Updated: September 6, 2014 00:27 IST2014-09-05T23:52:17+5:302014-09-06T00:27:18+5:30
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जिल्ह्यातील सात शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

जि.प.च्या सात शिक्षकांना पुरस्कार प्रदान
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जिल्ह्यातील सात शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अध्यक्षस्थानी जि. प. उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड तर मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, सभापती रंगराव कदम, मधुकर कुरुडे, राजाभाऊ मुसळे, निलावती सवंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी केले. तर उपशिक्षणाधिकारी व्ही. जी. पाटील यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले.
प्राथमिक विभागातून पिंपळखुटा शाळेचे शिक्षक माधव कुंडलिक वायचाळ, शिवनी बु. शाळेच्या महानंदा मधुकरराव जोशी, वसमत कें.प्रा.शा.चे श्रीराम गणेशराव संगेवार, सुकळी बु. शाळेचे रमेश पांडुरंग काळे, गढाळा शाळेचे उत्तम शंकरराव वानखेडे तर माध्यमिकच्या कुरुंदा प्रशालेतील दैवशीला नारायण खेबाळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर जवळा बाजार शाळेतील क्रीडाशिक्षक सुबोध सुधाकरराव मुळे यांना विशेष शिक्षकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे म्हणाले, रोजगारक्षम व संस्कारक्षम पिढी निर्माण होणे गरजेचे आहे. हे काम फक्त शिक्षकच करू शकतात. प्राथमिक शिक्षण हा पाया आहे. तो भक्कम झाला पाहिजे.
सभापती रंगराव कदम म्हणाले, हा पुरस्कार प्रातिनिधीक स्वरुपाचा आहे. अनेक शिक्षक उत्कृष्ट काम करतात. त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा.
शिक्षणाधिकारी पवार म्हणाले, गुरू ही प्रेरणा आहे. त्यामुळेच यशाचा मार्ग सापडतो.
उपाध्यक्ष गायकवाड म्हणाले, अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे काम शिक्षक करतो. बालकांना नव्हे, तर देश घडविण्याचे काम शिक्षकांच्या हातून घडते. अशा तमाम शिक्षकांचा गौरव करतो. सूत्रसंचालन अश्विनी कुरुंदकर यांनी केले. उपशिक्षणाधिकारी सोयाम यांनी आभार मानले.