जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2015 00:40 IST2015-07-07T00:18:13+5:302015-07-07T00:40:31+5:30
औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी शेंद्रा औद्योगिक वसाहतीत गुंतवणूक करावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत.

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा द्या
औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी शेंद्रा औद्योगिक वसाहतीत गुंतवणूक करावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील एकमेव वाळूज औद्योगिक वसाहत रोल मॉडेल बनवावी. येथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा द्याव्यात, अशी मागणी औरंगाबादेतील उद्योजकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
२९ जून ते ३ जुलैपर्यंत मुख्यमंत्री अमेरिका दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांच्यासमवेत औरंगाबादेतील उद्योजक मुकुंद भोगले, एन. श्रीराम, उमेश दाशरथी, भूषण जोशी, संजीव तांबोळकर, सुनील किर्दक यांची उपस्थिती होती. महाराष्ट्रात जास्तीत जास्त विदेशी गुंतवणूक यावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी विविध बैठकांमध्ये औद्योगिक महत्त्व विशद केले. सीआयआय या औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष एन. श्रीराम यांनी आज एका पत्रकार परिषदेत दौऱ्यांची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे राज्यात ३० ते ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. डीएमआयसी प्रकल्पांतर्गत विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी वाळूजची औद्योगिक नगरी रोल मॉडेल म्हणून तयार करणे गरजेचे असल्याचे स्थानिक उद्योजकांनी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना सांगितले.
वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे. चांगले दर्जेदार रस्ते तयार व्हावेत. या भागात ग्रीन बेल्टसाठी जागा तर आहे; पण झाडे कुठेच नाहीत. विविध कंपन्यांसमोर झालेली अतिक्रमणे दूर करावीत. औरंगाबाद ते मुंबई या प्रवासासाठी आठ पदरी रस्ता तयार करावा. जेणे करून नागरिकांना चार तासांतच मुंबई गाठता येईल.
नागपूर व्हाया औरंगाबाद- मुंबई असा आठ पदरी रस्ता असायला हवा, आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. पत्रकार परिषदेस सुनील किर्दक, अमोल मोहिते, बालाजी शिंदे, संदीप नागोरी आदींची उपस्थिती होती.