रेशन ग्राहकांना उत्तम दर्जाची साखर द्या
By Admin | Updated: January 23, 2015 00:53 IST2015-01-23T00:23:53+5:302015-01-23T00:53:01+5:30
जालना : रेशन ग्राहकांना उत्तम दर्जाची साखर द्यावी, अशी सूचना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण सचिव दीपक कपूर यांनी केली आहे.

रेशन ग्राहकांना उत्तम दर्जाची साखर द्या
जालना : रेशन ग्राहकांना उत्तम दर्जाची साखर द्यावी, अशी सूचना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण सचिव दीपक कपूर यांनी केली आहे. गुरूवारी मराठवाड्यातील पुरवठा अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद या आठही जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची विविध कामासंदर्भात आढावा बैठक राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण सचिव दीपक कपूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, पुरवठा विभागाचे उपायुक्त अनिल रामोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड, औरंगाबादचे जिल्हा पुरवठा अधिकारी जाधवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना कपूर म्हणाले की, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी अन्न सुरक्षा योजना, अंत्योदय योजना यासारख्या योजनांचा लाभ लाथार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा करण्यासाठी लाभार्थ्यांचे आधारकार्ड बँकेशी संलग्न करुन घेण्यात यावे. ज्या लाभार्थ्यांचे अद्यापपर्यंत आधार कार्ड किंवा बँक खाते नाहीत अशा लाभार्थ्यांसाठी विशेष कँपचे आयोजन करुन त्याचे आधार कार्ड व बँक खाती उघडण्यात यावीत. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पिकवलेला मक्याची विक्री लिलावाद्वारे करण्यात येते. परंतू सदरील पिकाची नोंद ७/१२ च्या उताऱ्यात आहे किंवा नाही याची खातरजमा करुन तो खरेदी करण्यात यावा. पुरवठा विभागामार्फत देण्यात येणारे केरोसिनचे परवाने प्रलंबित असतील तर ते तात्काळ देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या. तसेच साखर खरेदीची कारवाई करताना नियमानुसार तसेच पुरवठाधारकाकडून करारपत्र करुनच उत्तम दर्जाची अशी साखर खरेदी करण्याची कारवाई करावी.
यावेळी पाणी पुरवठा, चाराटंचाई, अन्नधान्य पुरवठा, शासकीय गोदामांची स्थिती, कार्यालयीन रिक्त पदे, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण याबाबतही सचिव दीपक कपूर यांनी व्यापक आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना केल्या.
मराठवाड्यात एकूण १७ लाख ९१ हजार ४५ गॅस धारक असून आधारकार्डशी संलग्न असलेल्या गॅस धारकांची संख्या ९ लाख ३४ हजार २७१ एवढी असून या ग्राहकांना १६३ गॅस एजन्सी द्वारे गॅसचा पुरवठा करण्यात येतो. अन्नधान्य साठविण्यासाठी नाबार्डकडून एकूण ४९ गोदामे मंजूर करण्यात आली असून त्यापैकी २२ गोदामांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच मराठवाडा विभागील पुरवठा विभागात अ,ब,क, व ड या संवर्गातील एकूण ७६२ पदे रिक्त असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी व त्यांचे सहकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बी.पी.एल. व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करण्याच्या योजनेचा शुभारंभ अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण सचिव दीपक कपूर यांच्या हस्ते जालना तालुक्यातील देवमूर्ती या गावी करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, पुरवठा विभागाचे उपायुक्त अनिल रामोड, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड, देवमूर्ती गावचे सरपंच गणेशराव तिडके, तहसिलदार रेवननाथ लबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
४या प्रसंगी कपूर म्हणाले की, शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतात. या पुढे शासनाच्या योजनांचे अनुदान बँक खात्यातच जमा होणार असल्याने गावातील प्रत्येक नागरिकांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करुन घ्यावे. या योजनेची माहिती सर्वसामान्यांना होण्यासाठी गावोगावी प्रचार व प्रसार करण्यात यावा. तसेच नागरिकांनी ही योजना १०० टक्के यशस्वी करण्यासाठीसहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.