एकहाती सत्ता द्या, पुढचा काळ काँग्रेसचाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:56 IST2017-10-04T23:56:15+5:302017-10-04T23:56:15+5:30
काँग्रेसच्या कार्यकाळात शहरातील अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. येणाºया काळात उर्वरित विकासकामांना गती देण्यासाठी महापालिका निवणुकीत काँग्रेसला स्वबळावर सत्ता द्या, विकासाची गॅरंटी मी घेतो, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री तथा काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभेत दिली.

एकहाती सत्ता द्या, पुढचा काळ काँग्रेसचाच
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: काँग्रेसच्या कार्यकाळात शहरातील अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. येणाºया काळात उर्वरित विकासकामांना गती देण्यासाठी महापालिका निवणुकीत काँग्रेसला स्वबळावर सत्ता द्या, विकासाची गॅरंटी मी घेतो, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री तथा काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभेत दिली.
प्रभाग क्रमांक ९ नवा मोंढा, दत्तनगर प्रभाग क्रमांक १० च्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ नंदीग्राम येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. अशोकराव चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, माजी महापौर बलवंतसिंघ गाडीवाले, किशोर स्वामी, पूजा पवळे, मनमीतकौर गाडीवाले़, प्रशांत तिडके, नारायणसिंघ तबेलेवाले, या प्रभागाचे उमेदवार विरेंद्रसिंघ गाडीवाले, बापूराव गजभारे, अल्का शहाणे, जयश्री पवार यांची उपस्थिती होती़
खा़ चव्हाण म्हणाले, काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात गुरु- त्ता- गद्दी तसेच जेएनएनयुआरएम योजनेत नांदेडचा समावेश झाल्याने अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला. यामुळे शहरातील विविध विकास कामे करण्यात आली. यात नदीघाट परिसराचे सुशोभिकरण, अद्ययावत रुग्णालय, स्टेडियम, विमानतळ, उड्डाणपूल, शहरातील रस्त्यांची कामे करण्यात आली. त्यामुळे शहराचा कायापालट झाला आहे. अद्यापही शहर विकासाची काही कामे शिल्लक असून उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्यासाठी महापालिकेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत द्या, असे आवाहन त्यांनी केले.
काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून योजना राबविल्या. प्रत्येक घटकाला न्याय व सर्वांचा विकास व्हावा असे धोरण काँग्रेसच्या कार्यकाळात घेण्यात आले होते. मात्र भाजप सरकारने जनतेला केवळ खोटी आश्वासने दिली आहेत. निवडणुकीपूर्वी दिलेल्या एकाही आश्वासनाची भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पूर्तता केली नाही. महापालिका निवडणुकीत भाजपा आता मत मागत आहेत. या भारतीय जनता पक्षाचे विकासासाठी काय योगदान आहे? भाजपा सरकारच्या तीन ते साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात नांदेडच्या विकासासाठी किती निधी दिला? असा सवाल खा. अशोकराव चव्हाण यांनी उपस्थित केला. शहरातील जनता आता भाजपाच्या थापाला बळी पडणार नाही. असा विश्वास व्यक्त करत नांदेडचा विकास आणखी गतीने करणार आहोत असेही ते म्हणाले़ यावेळी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस यांनी जनतेचा कल पुन्हा काँग्रेसकडे असल्याचे सांगत हा संदेश दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी महानगरपालिकेवर काँग्रेसला बहुमताने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.