सोने घेणारांची यादी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:36 IST2017-10-02T00:36:52+5:302017-10-02T00:36:52+5:30

मागील दोन वर्षांत ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे सोने खरेदी करणा-या ग्राहकांची यादी आयकर विभागाने शहरातील २५० पेक्षा अधिक ज्वेलर्सला मागितली आहे

 Give the list of gold customers | सोने घेणारांची यादी द्या

सोने घेणारांची यादी द्या

प्रशांत तेलवाडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मागील दोन वर्षांत ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे सोने खरेदी करणा-या ग्राहकांची यादी आयकर विभागाने शहरातील २५० पेक्षा अधिक ज्वेलर्सला मागितली आहे. तशा आशयाचे पत्र देण्यात आल्याने आता ज्वेलर्स बिलानुसार ग्राहकांची यादी करीत आहेत. आयकर विभाग या यादीतून आयकरचे विवरणपत्र न भरणा-या ग्राहकांना शोधून त्यांना कर भरण्यासाठी येत्या काळात नोटीस पाठविणार आहे.
मागील महिन्याच्या दुसºया पंधरवड्यात आयकर विभागाने शहरातील २५० पेक्षा अधिक लहान-मोठ्या ज्वेलर्सला पत्रे पाठविली आहेत.
यात आयकर कायदा १९६१ च्या १३३ (६) या नियमानुसार ज्वेलर्सकडून माहिती मागविण्यात येत आहे. ज्या ग्राहकांनी ५० हजार ते १ लाख ९९ हजार ९९९ रुपयांदरम्यान सोने, दागिने खरेदी केले. तसेच ज्यांनी २ लाखांपेक्षा अधिक रकमेचे सोने खरेदी केले अशा ग्राहकांची यादी मागविण्यात आली आहे. यात वर्षभरात दोन, तीन, चार टप्प्यांत जरी सोने खरेदी केले असेल व त्यांची रोख रक्कम ५० हजारपेक्षा अधिक होत असेल अशा ग्राहकांचे नाव व पत्ता देण्यास सांगितले आहे.
मागील दोन वर्षांतील खरेदीदारांची यादी देणे ज्वेलर्सला बंधनकारक आहे. पत्र मिळाल्यापासून महिनाभरात यादी आयकर विभागाला द्यावी लागणार आहे. आयकर अधिकारी विवेककुमार यांच्या सहीने पत्र देण्यात आले आहेत. यामुळे शहरातील प्रत्येक ज्वेलर्स बिलबुकनुसार यादी तयार करण्यास लागला आहे. यादी प्राप्त झाल्यानुसार त्या ग्राहकाचे उत्पन्न व खरेदीचे विश्लेषण करण्यात येईल. तो ग्राहक जर करपात्र असेल पण त्याने आयकर विवरणपत्र दाखल केले नसेल, अशा लोकांना शोधून त्यांना आयकर विभाग नोटीस पाठविणार आहे.

Web Title:  Give the list of gold customers