आयआयएम औरंगाबादला द्या

By Admin | Updated: July 18, 2014 01:54 IST2014-07-18T01:33:01+5:302014-07-18T01:54:46+5:30

औरंगाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटची (आयआयएम) स्थापना औरंगाबादेत झाल्यास मराठवाडा मागास आहे या प्रतिमेतून बाहेर पडायला मदत होईल

Give IIM to Aurangabad | आयआयएम औरंगाबादला द्या

आयआयएम औरंगाबादला द्या

औरंगाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटची (आयआयएम) स्थापना औरंगाबादेत झाल्यास मराठवाडा मागास आहे या प्रतिमेतून बाहेर पडायला मदत होईल व मोठ्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, अशी आग्रही भूमिका शहरातील उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात मदत करण्याचे आश्वासन दिले.
शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या पुढाकाराने चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या (सीएमआयए) शिष्टमंडळाची पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी गुरुवारी भेट झाली. सीएमआयएचे अध्यक्ष मुनीष शर्मा आणि मराठवाडा आॅटो क्लस्टरचे चेअरमन राम भोगले यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. आयआयएमची स्थापना रायपूर, रांची, उदयपूर यासारख्या टिअर टू शहरांमध्ये झाल्याचे शिष्टमंडळाने चव्हाण यांना सांगितले. केंद्र सरकारने महाराष्ट्रात आयआयएम स्थापन करण्याचे जाहीर केले असून महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आणि संशोधन संघटना असलेले औरंगाबाद त्यासाठी आदर्श आहे, असे या उद्योगपतींचे म्हणणे होते.
आयआयएमला शिक्षक मिळविण्यात टिअर टू शहरांना अडचणींना तोंड द्यावे लागल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना सांगितले. त्यावर उद्योगपतींनी गुवाहाटीत आयआयटीला प्रारंभी अशा अडचणी आल्याचे सांगताना आज गुवाहाटी आयआयटी देशात पहिल्या पाचात असल्याचे आवर्जून सांगितले.
आयआयएमसारख्या महत्त्वाच्या संस्था जोपर्यंत औरंगाबादेत सुरू होत नाहीत तोपर्यंत मराठवाडा मागास आहे ही मानसिक ठेवण बदलणार नाही, असे या शिष्टमंडळाने ठासून सांगितले. आयआयएमसाठी पुण्याचेही नाव चर्चेत आहे. तथापि, पुणे शहरात सध्याच प्रतिष्ठेचे म्हणता येतील, असे अनेक प्रकल्प असून आयआयएममुळे त्याला तसा कोणताही फायदा होणार नाही; परंतु आयआयएममुळे औरंगाबादच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असे ते म्हणाले. मराठवाड्याच्या संतुलित विकासासाठी औरंगाबादेत आयआयएम सुरू होणे उपयुक्त ठरले, असा शिष्टमंडळाचा आग्रह होता.
औरंगाबादला हवी आपली मदत
उद्योगपतींच्या या मागणी व भूमिकेला पाठिंबा देताना शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा मुख्यमंत्र्यांना म्हणाले की, औरंगाबाद हे भरभराटीला येत असलेले टू टिअर शहर असून आयआयएमसारख्या प्रतिष्ठेच्या संस्था या शहरात सुरू होण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे. त्यावर मुख्यमंत्री चव्हाण यांनी मराठवाड्याच्या हितासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Give IIM to Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.