१० रुपये एलबीटी भरणाऱ्यांना दंड नोटिसा द्या
By Admin | Updated: August 2, 2014 01:43 IST2014-08-02T01:37:37+5:302014-08-02T01:43:17+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीतील व्यापाऱ्यांनी एलबीटी कराला विरोध करण्याचे हत्यार उपसले होते. त्यांनी ते मागे घेतले

१० रुपये एलबीटी भरणाऱ्यांना दंड नोटिसा द्या
औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीतील व्यापाऱ्यांनी एलबीटी कराला विरोध करण्याचे हत्यार उपसले होते. त्यांनी ते मागे घेतले असले तरी मे व जून महिन्यात २२५ व्यापाऱ्यांनी एलबीटीचा निषेध म्हणून १० रुपये एलबीटी भरणा केला. त्या व्यापाऱ्यांकडून व्याजासह १२ लाख रुपये एलबीटी आकारण्याची भूमिका पालिका प्रशासनाने घ्यावी, यासाठी शिवसेना सरसावली आहे.
सेनेच्या मागणीवरून येत्या आठवड्यात व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ सूत्रांकडून समजले आहे. एलबीटी कर वेळेत न भरल्यास २ टक्के व्याजदराने कर आकारणी करण्यात येईल. सभापती विजय वाघचौरे यांनी याप्रकरणी आयुक्तांना पत्र दिले आहे.
व्यापाऱ्यांनी सध्या एलबीटी भरण्यास सुरुवात केली असली, तरी १० रुपये भरण्याच्या काळात शहरात कोट्यवधी रुपयांच्या मालाची आयात झाली आहे. त्यावरील एलबीटी व्यापाऱ्यांनी कशा पद्धतीने भरला आहे. याची गोळाबेरीज करण्याचे आदेश एलबीटी विभागाला देण्यात आले आहेत.
दोन महिन्यांतील असहकारामुळे मनपाचा १४ कोटी रुपयांचा एलबीटी बुडाला. सहनशीलतेचा अंत झाल्यामुळे मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी व्यापाऱ्यांना एलबीटी भरण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. मुदतीत करभरणा न केल्यास व्याजासह वसुलीचा इशारा नोटीसमधून देण्यात आला होता. त्या नोटिसीला व्यापाऱ्यांनीही प्रत्युत्तर दिले होते.
५ कोटींच्या एलबीटीवर दंड
५ कोटी रुपयांच्या एलबीटीवर २ टक्के व्याज आकारून १२ लाख रुपये वसूल करण्यात येणार आहेत. २३ हजार किरकोळ, तर ६ हजार ५०० ठोक व्यापाऱ्यांची एलबीटी विभागाकडे नोंद आहे. किरकोळ, ठोक व्यापाऱ्यांचाही आकडा वाढतो आहे. इन्कम व सेल्स टॅक्स विभागही पालिकेकडील माहितीचा आधार घेते.
कायदा काय सांगतो
महाराष्ट्र मनपा अधिनियम १९४९ च्या कलम ६७/२ नुसार मनपा हद्दीत मनपाचे शासन चालते. त्यामुळे एलबीटी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापाऱ्यांवर या कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते.