‘त्या’ आत्महत्याग्रस्त कुटुुंबाला तात्काळ मदत द्या
By Admin | Updated: November 23, 2014 00:24 IST2014-11-23T00:15:39+5:302014-11-23T00:24:40+5:30
लातूर : जिल्ह्यात शनिवारी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या दोन्ही गावात जबाबदार अधिकारी म्हणून स्वत: उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठवून त्यांच्या

‘त्या’ आत्महत्याग्रस्त कुटुुंबाला तात्काळ मदत द्या
लातूर : जिल्ह्यात शनिवारी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या दोन्ही गावात जबाबदार अधिकारी म्हणून स्वत: उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठवून त्यांच्या कुटुंबियांना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत पोहोचवा, असे आदेश महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आढावा बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिले.
शनिवारी जिल्हा दौऱ्यावर असलेल्या महसूलमंत्र्यांची शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खा. सुनील गायकवाड, आ. अमित देशमुख, आ. सुधाकर भालेराव, आ. संभाजीराव पाटील, आ. विनायकराव पाटील, आ. त्र्यंबक भिसे, जि.प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील, महापौैर अख्तर शेख, विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. पाडुरंग पोले, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, जि. प. चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मघमाळे, पोलिस अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. पांडुरंग पोले यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा सांगितला. यानंतर चित्रफित दाखविण्यात आली. पुढे महसूलमंत्री खडसे म्हणाले की, नजर आणेवारीवरुन शेतकऱ्यांना ज्या निकषाखाली मदत करण्याची नियमावली आहे. त्यावरुन आधी तातडीने शेतकऱ्यांना मदत पोहोचवली पाहीजे. प्रशासनाने यात हयगय करता कामा नये.
शिवाय संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने चारा लागवडीला प्रोत्साहन द्यावे. शेतकऱ्यांची वीजेची गरज लक्षात घेऊन सहा ते आठ तास दिवसा त्यांना वीज देणे गरजेचे आहे. रात्री वीज देऊन काहीही फायदा होत नाही. त्यामुळे दिवसा अखंडीतपणे वीज देण्याच्या सूचना केल्या. गरज असेल त्या गावात विहीरी अधिग्रहण, नरेगाची कामे आणि पाणी पुरवठा योजनांना गती द्यावी.